शिवाजीनगरमधील महिलेचा चाकूने भोसकून खून
By admin | Published: January 8, 2015 12:34 AM2015-01-08T00:34:34+5:302015-01-08T00:35:38+5:30
जिजामाता मार्केटजवळील घटना : संशयिताचा शोध सुरू
नाशिक : सातपूर येथील शिवाजीनगर परिसरातील जिजामाता मार्केटजवळ बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका पस्तीस वर्षीय महिलेवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली.या घटनेनंतर मारेकरी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे़
शोभा संजय पाटील (३५, गणेश प्रसाद सोसायटी, शिवशक्ती चौक, सातपूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, त्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन रायिटंग कंपनीत कामास होत्या. सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्या कंपनीत कामासाठी पायी जात होत्या़ जिजामाता मार्केटजवळ त्या पोहोचल्या असता त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्याने चाकूने हल्ला करून पलायन केले़ या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती़ महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली़ संजय पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ फिर्यादीत आर्थिक देवाण-घेवाणीतून खून केल्याचे म्हटले आहे. मयत शोभा पाटील या सुरुवातीस ओझर येथे वास्तव्यास होत्या. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या इसमाने टेम्पो विकत घेण्यासाठी पाटील यांच्याकडून ४० हजार रु पये उसने घेतले होते; मात्र पैसे देण्यास तो टाळाटाळ करीत होता़
तसेच संशयिताने वेळोवेळी पाटील यांच्या वडिलांना फोन करून, ‘तुमच्या मुलीने व जावयाने माझ्याकडून तीन लाख रु पये घेतले आहेत, ते परत करा, अन्यथा मी तुमचा जावई व मुलीला पाहून घेईन’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे शोभा पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०१४ रोजी राजू कुयटे या संशियताविरोधात जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्र ार दिली होती. भर रस्त्यात महिलेची हत्त्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे़ दरम्यान, नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)