शिवाजीवाडी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:16 AM2019-05-14T01:16:03+5:302019-05-14T01:16:21+5:30
: शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नंदिनी (नासर्डी) नदीलगत व मुंबई नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला शिवाजीवाडी परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून, पावसाळ्यात पावसाचे पाणी घरघरांत शिरणे, उघड्या गटारी आणि शौचालयाच्या अनियमित स्वच्छतेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
इंदिरानगर : शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नंदिनी (नासर्डी) नदीलगत व मुंबई नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला शिवाजीवाडी परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून, पावसाळ्यात पावसाचे पाणी घरघरांत शिरणे, उघड्या गटारी आणि शौचालयाच्या अनियमित स्वच्छतेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
नंदिनी नदीच्या कडेला वसलेल्या शिवाजीवाडीत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सुरुवातीला बोटावर मोजण्याइतक्या झोपड्या होत्या. परंतु शहराच्या विस्तारात शिवाजीवाडीचाही विस्तार झाला. आज अनेक झोपड्या याठिकाणी वसल्या असून, सुमारे पाच ते सहा हजार लोकांची वस्ती आहे. मात्र लोकवस्तीच्या मानाने याठिकाणी सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. या भागात अद्यापही गटारी उघड्या असल्याने व त्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्यामुळे या उघड्या गटारीच्या घाण व दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
तसेच पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने गटारी तुडुंब भरून घाण पाणी घराघरांत शिरते त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अनियमित स्वच्छता व आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे येथे वारंवार साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. शिवाजीवाडीला लागूनच म्हाडाने तेथे इमारती उभारल्या असून, सुमारे पंधरा वर्षांपासून ही घरे अर्धवट स्थितीत पडून आहेत. तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे म्हाडाची घरे पूर्ण होऊ शकली नाहीत. या अर्धवट घरांमुळे दगड- धोंडे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले तसेच या घरांचा वापर गैरकृत्यासाठी केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.
गरीब व हातावर पोट भरणाºया नागरिकांना रोजगारासाठी सकाळपासूनच घरातून बाहेर पडावे लागते. अशा वेळी सार्वजनिक शौचालयाची संख्या अपुरी पडते तसेच नियमित स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाडीदेखील नियमित येत नसल्याने व कचरा साठवण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या या भागाकडे मनपाचे दुर्लक्ष झाले असून, त्याचबरोबर अनेक प्रश्नही याठिकाणी उपस्थित झाले आहेत. अवैध धंदे, व गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
(उद्याच्या अंकात गरवारे वसाहत, अंबड)