शिवानी दुर्गा दावा दाखल करणार
By admin | Published: September 16, 2015 11:23 PM2015-09-16T23:23:30+5:302015-09-16T23:30:51+5:30
धर्माचार्य पदवीला आनंद आखाड्याचा आक्षेप
त्र्यंबकेश्वर : आपणाला धर्माचार्य ही पदवी देणाऱ्या आणि पट्टाभिषेक झाल्यानंतर अचानक जागे झालेल्या आनंद आखाड्याच्या रमता पंचने तीन दिवसांत लेखी माफी न मागितल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा शिवानी दुर्गा यांनी दिला आहे.
सागरानंद महाराज यांनी शिवाजी दुर्गासह तीन साधूंना बहाल केलेल्या पदव्यांना आनंद आखाड्याने आक्षेप घेतल्यानंतर शिवानी दुर्गा यांनी आनंद आखाड्यावर टीका केली. धर्माचार्य पदवी बहाल करून कित्येक दिवस झाल्यानंतर आनंद आखाड्याच्या रमता पंचला आताच जाग का आली, असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. येथील साधुग्राममध्ये सर्वेश्वरी आश्रमात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या पुढे म्हणाल्या की, मला दिलेली पदवी काढून घेण्यात येत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे समजली. यामुळे आपल्या आत्मसन्मानाला मोठा धक्का बसला आहे. जर रमता पंच सर्व निर्णय घेत असेल तर आनंद आखाडा पदवी देतो आहे हे त्यांना समजत नाही का? या दोघांच्या एकमेकांशी ताळमेळ नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपली पदवी का काढून घेतली जात आहे? यात आपला काय दोष आहे, हाही प्रश्न निर्माण झाल्याचे शिवानी दुर्गा यांनी म्हटले आहे. असे काय झाले की अचानक धर्माचार्य पदाला आपण लायक नसल्याचा साक्षात्कार आनंद आखाड्याला झाला. त्यांनी पदव्या निष्कासित केल्यामुळे आपली प्रतिष्ठा पणाला लागली असून, आपली फसवणूक करणाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. पदवी बहाल झाल्यानंतरच आपणाला ओळख मिळाली असे नव्हे तर अनेक वर्षांपासून आपण धर्मप्रसाराचे काम करत असल्यामुळे आपली ओळख आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)