शिवभोजन थाळीचे काम महिला बचत गटांना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:56 PM2020-02-16T18:56:53+5:302020-02-16T18:58:04+5:30
दिल्ली हार्ट मार्केटच्या धर्तीवर नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथे कलाग्राम उभारण्यात येत आहे. कलाग्रामचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आघाडी शासनाने गरीब कुटुंबांसाठी २६ जानेवारीपासून शिवभोजन थाळी सुरू केली असून, या थाळीसाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याद्वारे गरिबांना अन्न तर बचत गटांना उत्पन्न मिळण्यास मदत होणार असून, मार्चपासून दररोज १ लाख कुटुंबांना शिवभोजन थाळीद्वारे पोटभर अन्न देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक विभाग यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सव आणि स्वयंसहाय्यता समूहातील महिला सदस्यांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भुजबळ पुढे म्हणाले, दिल्ली हार्ट मार्केटच्या धर्तीवर नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथे कलाग्राम उभारण्यात येत आहे. कलाग्रामचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल. कलाग्राममध्ये १०० स्टॉल्स असून हॉल, प्रशिक्षण हॉल, वीज, पाणी सुविधा उपलब्ध आहे. महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी हे स्टॉल्स कायमस्वरूपी बचत गटांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. महिला बचत गट चळवळ ही ग्रामीण भागातील महिलांची शक्ती असून, त्याद्वारे महिला संघटित होऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. महिलांच्या सक्षमीकरण आणि स्वावलंबनासाठी महिला बचत गटांचा मेळावा महत्त्वपूर्ण असून, महिलांना ऊर्जा देणारा आहे. महिलांनी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या कामाचा आदर्श घेऊन कोणत्याही परिस्थितीला न घाबरता वाटचाल करावी, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. यावेळी आमदार सरोज अहिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विभागीय उपायुक्त प्रतिभा संगमनेरे यांनी केले, तर इशाधिन शेळकंदे यांनी आभार मानले.