शिवनगर, बजरंगनगर मूलभूत सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:49 PM2019-06-02T23:49:13+5:302019-06-03T00:08:58+5:30

गंगापूररोडवरील आनंदवली गावातील शिवनगर, बजरंगनगर या वसाहती अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त झाल्या आहेत. या वसाहती ३५ वर्षांपासून गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने काहींना घरपट्टी लागू आहे

 Shivnagar, Bajranganagar deprived of basic amenities | शिवनगर, बजरंगनगर मूलभूत सुविधांपासून वंचित

शिवनगर, बजरंगनगर मूलभूत सुविधांपासून वंचित

Next

गंगापूर : गंगापूररोडवरील आनंदवली गावातील शिवनगर, बजरंगनगर या वसाहती अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त झाल्या आहेत. या वसाहती ३५ वर्षांपासून गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने काहींना घरपट्टी लागू आहे, तर काहींना घरपट्टी लागू नसल्यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत तर आहेच, मात्र या ठिकाणी महापालिकेच्या वतीने मूलभूत सुविधाही कमी प्रमाणात पुरविल्या गेल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
या वसाहतीतील नागरिकांनी महापालिकेच्या सातपूर विभागात अनेकवेळा सुविधांसाठी चकरा मारल्या मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जाते. गटारी खुल्या आहेत, रस्त्यावर पाणी साचते, रात्री लाईट नसते, घंटागाडी कचरा उचलण्यास लवकर येत नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या परिसरात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
गंगापूर रोडवरील शिवनगर व बजरंगनगर गेल्या अनेक वर्षांपासून वसलेली वसाहत आहे. सातपूर परिसरात औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करून, हातगाडी लावून तर काही लहान-मोठा घरगुती व्यवसाय करून उपजीविका भागवतात. महापालिका क्षेत्रात ही वसाहत येत असले तरी महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष झालेले दिसते. येथील संतप्त नागरिकांनी सांगितले की, या भागात रस्ते अरुं द असल्याचे कारण देऊन घंटागाडीच मनपाने बंद करून टाकली. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरते. त्यामुळे परिसरात डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू, चिकुनगुन्या, थंडीताप, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका असल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील वसाहतीत कधी कधी पाणी कमी दाबाने आणि गढूळ येत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. या भागात साफसफाई होत नाही. नागरिकांनी घरातला कचरा टाकायचा तरी कुठे असा सवाल मंगलबाई सापटे यांनी केला आहे. या भागाकडे मनपाचे दुर्लक्षच होते. झोपडपट्टी परिसर असल्याने या भागात मच्छर मोठ्या प्रमाणात आहेत. या भागात स्वच्छता मोहीम, औषध फवारणी, धूर फवारणी करावी मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे देवराम खाडे यांनी सांगितले.
(उद्याच्या अंकात : गंजमाळ परिसर)
स्वच्छता, पाणी, आरोग्याच्या समस्या कायम
पावसाळ्यात या भागात गटारीचे पाणी घरात घुसते त्यामुळे रोगराई पसरून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सर्व पाणी घरासमोर तुंबून त्याचे तळे तयार होऊन दुर्गंधी सुटते. त्याचा सामना करावा लागतो. परिसरातील शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे. सफाई करण्यासाठी कर्मचारी लवकर येत नाही. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात गटार तुंबतात, नळाला त्या गटारीचे पाणी येते, तेच प्यावे लागत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. या भागात पोलिसांच्या दुर्लक्षाने अवैध धंदे सुरू असतात. या भागात भुरट्या चोऱ्या होतात. अशा समस्यांकडे महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या भागात स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मुलांना खेळण्यासाठी हक्काचे ग्राउंड नाही की उद्यान नाही.

Web Title:  Shivnagar, Bajranganagar deprived of basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.