शिवरायांचा स्त्री सन्मानाचा दृष्टिकोन आजही बाळगायला हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 03:58 PM2021-02-19T15:58:11+5:302021-02-19T16:00:59+5:30

छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना त्यांचे आचार-विचार आपण जपतेाय का,  असा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांच्या विचारांचे अनेक पैलू होते. त्यातील महिलांविषयक त्यांचे विचार अत्यंत संवदेनशील होते. स्त्रीचा सन्मान त्यात ओतप्रोत भरलेला होता. आज समाजातील अनेक घटना बघता शिवरायांचे हेच विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Shivratri's attitude of respecting women should be maintained even today! | शिवरायांचा स्त्री सन्मानाचा दृष्टिकोन आजही बाळगायला हवा !

शिवरायांचा स्त्री सन्मानाचा दृष्टिकोन आजही बाळगायला हवा !

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांविषयी आदरशत्रूंच्या महिलांनाही संरक्षण

छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना त्यांचे आचार-विचार आपण जपतेाय का,  असा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांच्या विचारांचे अनेक पैलू होते. त्यातील महिलांविषयक त्यांचे विचार अत्यंत संवदेनशील होते. स्त्रीचा सन्मान त्यात ओतप्रोत भरलेला होता. आज समाजातील अनेक घटना बघता शिवरायांचे हेच विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

छत्रपती शिवरायांचे स्त्रीसंबंधीचे धोरण स्वयंभूच होते. तथापि, मातोश्री जिजाऊंच्या शिकवणीमुळे राजांचे व्यक्तिमत्त्व अशा अंशाने आकार घेत गेले. बालवयात झालेले संस्कार दूरगामी परिणाम करणारी ठरत असतात. जिजाऊंना मातेच्या भूमिकेशिवाय प्रसंगानुरूप पित्याचीही भूमिका पार पाडावी लागे. या दोन्ही भूमिकेचे बाल शिवरायांनी चांगलेच अवलोकन केले असणार, परंतु शिवरायांच्या मनःपटलावर आईची छाप प्रभावी ठरल्यास नवल नाही.

बालशिवाजीने आईची दयाबुद्धी, उदार अंतःकरण, न्यायशीलता, जबाबदारवृत्ती आणि प्रसंगी कठोरपणा इत्यादी गुण तत्त्वे आत्मसात केली. परस्त्री मातेसमान लेखणारे, शत्रुपक्षाकडील स्त्रियांचाही सन्मान करणारे, प्रगतशील विचार बाळगून त्यावर अंमल करणारे, मध्ययुगीन काळात केवळ छत्रपती शिवाजी महाराजच असू शकतात. परंतु दुर्दैवाने त्यांची स्त्रीवादी भूमिका फारशी उजेडात आली नाही. डॉ. दिनेश मेारे लिखित ‘छत्रपती शिवरायांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन’ या पुस्तकात छत्रपती शिवरायांच्या भूमिकांचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. 

ज्या काळात बादशाही सरदार वतनदार वगैरे स्त्रियांना पळवून नेणे, अब्रू लुटणे, जनानखान्यात जबरीने कोंबणे, गुलाम करणे असे प्रकार करीत असत अशा अंदाधुंदीच्या काळात मराठी सैनिक शिवरायांचा आदेश शिरोधार्य मानून स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करीत होते.

बादशाही सरदार युद्ध मोहिमेवर निघताना लवाजमाच घेऊन निघत. लढाईला निघाले की सैन्याबरोबर व्यापारी, साधनसामग्री, नर्तकी हे सर्वकाही यात असायचे. रणभूमीवर पराभूत झाल्यावर या स्त्रियांची कशी वाताहत होत असेल याची कल्पना न केलेली बरी. म्हणून शिवरायांचे धोरण काळाच्या फार पुढचा विचार वाटते. त्यांनी स्त्रियांची संभाव्य विटंबना टाळण्यासाठी आपल्या फौजेला सक्त ताकीद दिली होती की, आपल्याबरोबर छावणीत अथवा मोहिमेवर असताना धर्मपत्नी, कुळंबी अथवा रक्षाबरोबर घेऊ नये. मध्ययुगात शिवरायांखेरीज असे नियम इतर सत्ताधीशांनीही बनविलेले ऐकवितात नाही. मार्टिन नावाचा एक फ्रेंच अधिकारी कर्नाटक मोहिमेवर तीन दिवस होता. तो आपल्या रोजनिशीत लिहितो की,  शिवाजीराजांच्या छावणीमध्ये कसलाही भपका नव्हता, अनावश्यक सामानाची गर्दी नव्हती आणि स्त्रियांना तेथे संपूर्ण बंदी होती. 

स्त्रियांना मोहिमेवर आणू नये या नियमांची अंमलबजावणी तर झालीच. पण शत्रू पक्षाकडील स्त्रियांनाही कोणत्याच प्रकारचा त्रास देऊ नये याची जाणीवपूर्वक दखल शिवरायांनी घेतली. तसेच या नियमांचे आपले सैनिक पालन करतात की नाही यावर करडी नजर ठेवली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास जबर शिक्षा फर्मावली जात असे.

स्त्रियांसंबंधीच्या गुन्ह्याला अजिबात क्षमा नव्हती, मग तो कितीही मोठ्ठा सरदार असो. ‘फॉरीन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ या ग्रंथामध्ये युरोपियन लेखक म्हणतो, शिवाजींच्या सैन्यातील सर्व शिपायांना कोणाही स्त्रीस उपद्रव देता कामा नये, अशी सक्त ताकीद दिली होती. हा हुकूम जर कोणी मोडेल, तर त्यात इतकी कडक शिक्षा करण्यात येईल, की तिचा धाक इतर सैनिकांना बसून त्यांनी तसे कृत्य करण्यास धजू नये. शिवरायांच्या दृष्टीने हा गंभीर गुन्हा होता. म्हणून त्यांनी त्यासाठी शिक्षाही गंभीर ठेवल्या होत्या. उदाहरणार्थ हातपाय तोडणे, डोळे काढणे अथवा देहदंड करणे इत्यादी.

शिवरायांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर स्वतः बादशहा औरंगजेब उद्गारला होता की, आपल्या हातात पडलेल्या शत्रूंचा स्त्रियांच्या अब्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला. यावरून शिवरायांची स्त्रीविषयक उदार दृष्टी दिसून येते.

 - माधूरी दिपक भदाणे, प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड

Web Title: Shivratri's attitude of respecting women should be maintained even today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.