भाजपा सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी रोखली वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:35 AM2018-01-28T01:35:26+5:302018-01-28T01:35:51+5:30
‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’, ‘कहॉ गये अच्छे दिन’, ‘ हिंदू-मुस्लीम, सीख-इसाई सबके घर पहुची महंगाई’ असे विविध घोषवाक्य लिहिलेले काळे फलक व भगवे झेंडे हातात घेऊन द्वारकेवर भाजपा सरकारच्या निषेधार्थ शेकडो शिवसैनिक एकत्र आले. शिवसैनिकांनी येथे ठिय्या आंदोलन करत सुमारे तासभर वाहतूक रोखली.
नाशिक : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’, ‘कहॉ गये अच्छे दिन’, ‘ हिंदू-मुस्लीम, सीख-इसाई सबके घर पहुची महंगाई’ असे विविध घोषवाक्य लिहिलेले काळे फलक व भगवे झेंडे हातात घेऊन द्वारकेवर भाजपा सरकारच्या निषेधार्थ शेकडो शिवसैनिक एकत्र आले. शिवसैनिकांनी येथे ठिय्या आंदोलन करत सुमारे तासभर वाहतूक रोखली. पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅसच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ सर्वसामान्यांच्या जिवावर उठली आहे; मात्र भाजपा सरकारला याबाबत काहीही देणे-घेणे नसून दररोज होणारी इंधनाची दरवाढ थांबवावी, पेट्रोल, गॅसचे दर कमी करावे या मागणीसाठी शहर-जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.२७) द्वारकेवर सकाळी अकरा वाजता ठिय्या व घंटानाद आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे, डी. जे. सूर्यवंशी, सूर्यकांत लवटे, सुधाकर बडगुजर, श्याम साबळे, दिलीप दातीर, महिला आघाडीच्या शालिनी दीक्षित, वाहतूक सेनेचे शिवाजी भोर, विद्यार्थी सेनेचे योगेश बेलदार, उमेश चव्हाण, माजी नगरसेवक संजय चव्हाण आदी पदाधिकाºयांसह शेकडो शिवसैनिकांनी द्वारकेवरील सर्व रस्त्यांच्या प्रारंभी ठिय्या देत वाहतूक पूर्णपणे रोखली. मुंबई नाका, जुने नाशिक, सारडा सर्कलच्या दिशेने शेकडो शिवसैनिक हातात भगवे ध्वज घेऊन घोषणाबाजी करत द्वारकेवर दाखल झाले. मोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणाºया या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले. दरम्यान शिर्डीकडे जाणाºया गुजरात परिवहन महामंडळाच्या बसवर शिवसैनिकांनी भगवा ध्वज लावला. तसेच या बसला द्वारका वाहतूक बेटाभोवती अडवून बसपुढे ठिय्या दिला.
गळ्यात गाजरांचे हार
‘देशाचा आवाज काय सांगतो, गाजर पुरेसे अख्खा देश बोलतो...’ अशा घोषणेचे फलक झळकवित शिवसैनिकांनी गाजराचे तयार केलेले हार गळ्यात घालून सत्ताधारी भाजपा सरकारचा निषेध नोंदविला. तसेच हातात गाजर घेऊन आंदोलकांनी भाजपाने जनतेला आश्वासनांचे गाजर दाखविल्याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध घोषणा देत शिवसैनिकांनी द्वारका परिसर दणाणून सोडला.