नाशिकमध्ये विनापरवाना चालविल्या जाणा-या टेरेस रेस्टॉरंटप्रकरणी शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:23 PM2018-01-01T19:23:02+5:302018-01-01T19:24:31+5:30
विनापरवाना व्यवसाय : सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्याची मागणी
नाशिक - लोअर परेलमधील कमला कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने अनधिकृत हॉटेल्सविरोधी धडक मोहीम सुरू केली असताना नाशिक महापालिकेतही प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेने टेरेस रेस्टॉरंटप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्याची मागणी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.
मुंबईतील आगीच्या दुर्घटनेत १४ निष्पाप जीवांचे बळी गेले. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता अनधिकृत हॉटेल्सविरोधात कारवाई आरंभली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका निभावणा-या शिवसेनेने शहरातील अनधिकृत हॉटेल्सविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, शहरात ठिकठिकाणी तळमजल्यावर आणि इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतपणे हॉटेल्स-रेस्टॉरंट सुरू आहेत. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा एकही हॉटेल्सने आग प्रतिबंधक उपाययोजनेसंबंधी परवानगी घेतलेली नाही तर नगररचना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा एकाही हॉटेल्सला नगररचना विभागाने परवानगी दिलेली नाही. असे असताना शहरात सर्रासपणे टेरेससह तळमजल्यावर विनापरवाना हॉटेल्स सुरु आहेत. अशा हॉटेल्सला अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली कशी, असा सवालही बोरस्ते यांनी केला आहे. वास्तविक त्या-त्या विभागीय अधिका-यांनीही अशा हॉटेल्सच्या तपासणीबाबत जबाबदारी घेतली पाहिजे. महापालिकेने शहरातील सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करावे आणि मुंबईतील दुर्घटनेचा बोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. एकीकडे शहर स्मार्ट बनविण्याची तयारी चालविली जात असताना अनधिकृतपणे फोफावलेल्या व्यवसायाकडे मात्र डोळेझाक होताना दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर हुक्का पार्लरही सुरू आहेत. त्यावरही कुठेही कारवाई होताना दिसून येत नसल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले.
व्यावसायिक घरपट्टी आकारा
शहरातील हॉटेल्सचे सर्वेक्षण करतानाच त्यांच्याकडून होणा-या व्यवसायामुळे अशा हॉटेल्सकडून व्यावसायिक दराने घरपट्टीची आकारणी करावी. जे हॉटेल्स आगप्रतिबंधक उपाययोजना पूर्ण करतील, अशा हॉटेल्सचे वाढीव बांधकाम नियमित करण्यासाठी त्यांना नव्या अनधिकृत बांधकाम धोरणानुसार हॉर्डशिप प्रीमिअमही आकारता येईल. त्यातून महापालिकेला मोठ्या प्रमाणावर महसूलही मिळू शकतो, अशी सूचनाही अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. .