इच्छुक झाले अमाप, नेत्यांच्या डोक्याला ताप; पक्षांची मोठी कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:47 PM2022-03-04T16:47:35+5:302022-03-04T16:56:55+5:30
शैलेश कर्पे सिन्नर - सिन्नर शहरालगत पूर्व भागात असलेल्या मुसळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही ...
शैलेश कर्पे
सिन्नर - सिन्नर शहरालगत पूर्व भागात असलेल्या मुसळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांना इच्छुकांची समजूत घालण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोघा विरोधी नेत्यांना ताप होणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना अंतिम टप्प्यात उमेदवार जाहीर करण्याची खेळी उभय नेत्यांकडून होणार आहे.
मुसळगाव जिल्हा परिषद गटावर पूर्वी माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचे वर्चस्व होते. त्यांच्या कार्यकाळात या गटातून डॉ. प्रतिभा भरत गारे व त्यानंतर डॉ. पी. बी. चांदोरे विजयी झाले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे आमदार झाल्यानंतर या गटातून त्यांचे समर्थक सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे माजी अध्यक्ष दिलीप शिंदे व त्यानंतर राजेश नवाळे विजयी झाले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे यांच्या पत्नी वैशाली खुळे विजयी झाल्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने कोकाटे यांच्या ताब्यातून मुसळगाव गट ओढून घेतला होता. आता मात्र कोकाटे पुन्हा आमदार झाल्याने शिवसेनेला मुसळगाव गट राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
राज्यात महाआघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सिन्नरच्या निवडणुका आजी-माजी आमदार असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात रंगणार असल्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने मुसळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी व सेना यांनी उमेदवार चाचणीला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी व सेना या दोन्ही पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यात मुसळगाव गटात नवीन फेररचनेत काही गावे कमी-अधिक झाल्याने त्याचा फायदा-तोटा नेमका कोणाला होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुसळगाव गटात वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राजेंद्र चव्हाणके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, वडांगळीचे माजी उपसरपंच नानासाहेब खुळे, मुसळगावचे उपसरपंच अनिल शिरसाट, माजी उपसरपंच रवींद्र शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून भोकणीचे सरपंच व सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ, विद्यमान सदस्य वैशाली खुळे यांचे पती दीपक खुळे, किर्तांगळीचे सरपंच दगू चव्हाणके, खोपडीचे उपसरपंच शरद गुरुळे यांच्या नावाची चर्चा आहे. याखेरीज प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. भरत गारे, औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांचे पुत्र व युवा उद्योजक अविनाश पोटे, कुंदेवाडीचे विद्यमान सरपंच रतन नाठे, मनेगावचे ॲड. संजय सोनवणे, भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुनील माळी यांच्या नावांचीही चर्चा रंगत आहे.