शिवसेना-कॉँग्रेस आघाडी निर्णायक वळणावर
By admin | Published: March 8, 2017 01:28 AM2017-03-08T01:28:19+5:302017-03-08T01:28:31+5:30
नाशिक : कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचाच, या हेतूने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या जोडीला कॉँग्रेस व माकपा या पक्षांना घेण्याची तयारी केली आहे.
नाशिक : मतदारसंघात आलेल्या दारुण अपयशानंतर कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचाच, या हेतूने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या जोडीला कॉँग्रेस व माकपा या पक्षांना घेण्याची केलेली तयारी निर्णायक वळणावर आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बुधवारी (दि.८) मुंबई महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर लगेचच या आघाड्या आणि युतींना वेग येणार असून, शिवसेनेची भाजपाला सोबत घेण्याची अजिबात इच्छा नसल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपानेही स्वबळावर जिल्हा परिषदेवर इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलविण्यासाठी जोड-तोडचे राजकारण सुरू केले असून, प्रसंगी अपक्षांना पदे देऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर भाजपाचाच सदस्य बसविण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे.
अर्थात भाजपाला जोडी असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही अध्यक्षपदावर दावा सांगितला असून, तडजोडीअंती भाजपाला जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासह महत्त्वाची पदे पदरात पाडून शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची चर्चा आहे. तिकडे शिवसेनेने कॉँग्रेससह माकपालाही आघाडीत जोडी घेऊन एक सभापतिपद देऊ केल्याची चर्चा आहे.
येत्या काही दिवसांत शिवसेना व कॉँग्रेसचे सदस्य एकत्रित सहलीला जाणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात शिवसेना व कॉँग्रेस दोन्ही बाजूने सहलीबाबत कोणीही दुजोरा दिलेला नाही. मात्र शिवसेना व कॉँग्रेसची आघाडी होण्याबाबत प्राथमिक स्वरूपात बोलणी झाल्याबाबत दुजोरा दिला आहे. शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य असून, कॉँग्रेसचे आठ सदस्य जोडीला घेत दोन अपक्ष व माकपच्या जोडीने शिवसेना-कॉँग्रेस आघाडीचे संख्याबळ ३८ इतके होणार असल्याने अध्यक्ष शिवसेनेचाच राहील, असा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)