शिवसेनेत नेतृत्व बदलाचे संकेत; जिल्हाप्रमुखपदी बडगुजर ? खांदेपालट : आगळे, दातीर यांचीही नावे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:05 AM2018-04-04T01:05:20+5:302018-04-04T01:05:20+5:30
नाशिक : शिवसेनेच्या शहर नेतृत्वात खांदेपालट केल्यानंतर आता जिल्हा शिवसेनेच्या नेतृत्वातही बदल करण्याचे संकेत मिळू लागले असून, त्यासाठी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर आहे.
नाशिक : शिवसेनेच्या शहर नेतृत्वात खांदेपालट केल्यानंतर आता जिल्हा शिवसेनेच्या नेतृत्वातही बदल करण्याचे संकेत मिळू लागले असून, त्यासाठी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय जगन आगळे व नगरसेवक दिलीप दातीर यांच्याही नावांची चर्चा होऊ लागली आहे. पक्ष नेतृत्वाने शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वात बदल करण्यामागचे कारण स्पष्ट केले नसले तरी, अजय बोरस्ते यांच्यावर महानगरप्रमुख व मनपा विरोधी पक्षनेतेपद अशी दुहेरी जबाबदारी असल्यामुळे फेरबदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता एका महानगरप्रमुखाकडून पक्ष संघटना बांधणीस मर्यादा पडू शकते हे हेरून मुंबईच्या धर्तीवर एकापेक्षा अधिक महानगरप्रमुख नेमण्याचा पॅटर्न नाशकात वापरण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेतही फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी मध्यंतरी पक्ष नेत्यांची भेट घेऊन फिल्डिंग लावली आहे.
उत्तर महाराष्टÑाचे संपर्क नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे नाशिकचीही जबाबदारी असल्यामुळे त्यांची याकामी महत्त्वाची भूमिका आहे. त्यातूनच राऊत यांचे निकटवर्तीय नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. बडगुजर हे तिसऱ्यांदा नाशिक महापालिकेत निवडून आले आहेत. सेनेतील जुन्या पदाधिकाºयांशी त्यांचे सख्य आहे. अशा परिस्थितीत बडगुजर यांचे पारडे जड मानले जात आहे. याशिवाय नाशिक तालुक्याचे नेते जगन आगळे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. आगळे हे कट्टर सैनिक असून नाशिक, सिन्नर या तालुक्यावर त्यांचे प्रभुत्व आहे. नगरसेवक दिलीप दातीर हेदेखील स्पर्धेत आहेत. नाशिक शहरातील बहुचर्चित भंगार बाजार हटविण्यासाठी त्यांनी महापालिकेला भाग पाडले तसेच दोन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीत असलेले तिघेही इच्छुक एकाच गटातील असल्यामुळे त्यांच्यात सहमती घडवून आणणे पक्ष नेतृत्वाला सहज शक्य आहे. येत्या आठवडाभरात यासंदर्भातील घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.