नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; विजय करंजकरांचा पत्ता कट, उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:05 AM2024-03-27T11:05:54+5:302024-03-27T11:09:48+5:30
Vijay Karanjkar: विजय करंजकर यांनी कालच आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड होणार आहे.
Nashik Lok Sabha ( Marathi News ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी अखेर आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उद्धव ठाकरे यांनी १७ उमेदवारांची घोषणा केली असून काही ठिकाणी त्यांच्याकडून धक्कातंत्राचा अवलंबही करण्यात आला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजय करंजकर यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता होती. मात्र उद्धव ठाकरेंनी या जागेवर राजाभाऊ वाजे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मागील दोन आठवड्यांपासून नाशिकच्या उमेदवारीसाठी अचानक राजाभाऊ वाजेंचे नाव चर्चेत आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर नाशिकमधून वाजे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं.
नाशिकमध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत उमेदवारी मिळवलेले राजाभाऊ वाजे हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ साली ते सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. राजाभाऊ वाजेंना मोठा राजकीय वारसाही लाभला आहे. त्यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार होते . त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून १९६७ साली निवडून आल्या होत्या. तसंच राजाभाऊ वाजेंचे वडील प्रकाश वाजे यांनी देखील २००९ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सिन्नर येथून लढवली होती .
शिवसेनेत २०२२ साली झालेल्या फुटीनंतर नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र या फुटीनंतरही राजभाऊ वाजे हे मात्र ठामपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. आता लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊन उद्धव ठाकरे यांनी वाजे यांना निष्ठेचं बक्षीस दिल्याचं बोललं जात आहे.
विजय करंजकरांच्या नावाची होती जोरदार चर्चा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून रंगत होती. त्या अनुषंगाने मतदारसंघ पिंजून काढत करंजकर यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. विशेष म्हणजे कालच विजय करंजकर यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. "विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या स्टेटसच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. लोकसभा तुलाच लढवायची आहे, असा आदेश मला उद्धव साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे मी लढणारच आणि नाशिक जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने जिंकणार सुद्धा," असा विश्वास विजय करंजकरांनी व्यक्त केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड होणार आहे.
दरम्यान, विजय करंजकर यांच्या जनाधाराबाबत पक्षनेतृत्व साशंक असल्याने ऐनवेळी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. तिकीट कापल्याने विजय करंजकर या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.