शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’
By admin | Published: July 10, 2017 10:53 PM2017-07-10T22:53:30+5:302017-07-10T22:54:06+5:30
याद्या मागितल्या : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती फसवी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा बॅँकेसमोर शिवसेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमुक्ती फसवी असून, जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. त्याचाच भाग म्हणून राज्यात सर्व बॅँकांसमोर शिवसेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी केले.
द्वारका येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आवारात सोमवारी (दि. १०) शिवसेनेच्या वतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची मागणी करण्यात आली. तसेच ढोल वाजवून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. ‘ढोल बजाओ’ आंदोलनात संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची खरी माहिती शिवसेनेला हवी आहे. सरकारने केलेली कर्जमाफीची आकडेवारी फसवी आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा बँकांसह सर्वच बँकांकडून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागण्यासाठी जाब विचारणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विलास बोरस्ते यांनी कर्जमाफीचा शासन निर्णय अद्याप प्राप्त नसून, कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. याद्या तयार झाल्यानंतर त्या देण्यात येतील, असे सांगितले. यावेळी जिल्हा बॅँक अध्यक्षांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनपा गटनेते विलास शिंदे, चंदक्रांत लवटे, सुधाकर बडगुजर, जगन्नाथ आगळे, डी. जी. सूर्यवंशी, शिवाजी भोर, नितीन चिडे, सुदाम ढेमसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.