सभापतिपदी शिवसेनेचे गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:45 PM2019-07-05T23:45:13+5:302019-07-06T00:16:01+5:30
सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे होते. ऐनवेळी भाजपाचे उमेदवार हेमलता कांडेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड घोषित केली.
सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे होते. ऐनवेळी भाजपाचे उमेदवार हेमलता कांडेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड घोषित केली.
सातपूर विभागीय कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेचे संतोष गायकवाड आणि भाजपाचे हेमलता कांडेकर हे दोघे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला यावेळेत भाजपाचे हेमलता कांडेकर यांनी माघार घेतली. गायकवाड यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गायकवाड यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित केली. या निवडणुकीत सलीम शेख, दिनकर पाटील, योगेश शेवरे, वर्षा भालेराव, रवींद्र धिवरे, शशीकांत जाधव, इंदूबाई नागरे, पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, अलका अहिरे, विलास शिंदे, नयना गांगुर्डे, राधा बेंडकोळी, दिलीप दातीर, हर्षदा गायकर, भागवत आरोटे, सीमा निगळ आदी सहभागी झाले होते, तर रिपाइंचे नगरसेवक दीक्षा लोंढे निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहिल्या. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे आगमन झाले.
गायकवाड यांची बिनविरोध झाल्यानंतर आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, महेश हिरे, अजय बोरस्ते, देवा जाधव, नाना वाघ, अलका गायकवाड आदींसह युतीच्या पदाधिकाºयांनी व नगरसेवकांनी गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रभाग क्रमांक १० च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार इंदुबाई नागरे यांच्या बिनविरोध निवडीसाठी शिवसेनेने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्याची परतफेड म्हणून प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत भाजपाने माघार घेत शिवसेनेला मदत केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. यापुढेही शिवसेना-भाजपा युती अभेद्य राहील.
- विलास शिंदे, गटनेता शिवसेना