बससेवा मनपाने ताब्यात घेण्यास शिवसेनेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:12 AM2018-02-02T01:12:05+5:302018-02-02T01:15:49+5:30
नाशिक : महापालिकेने तोट्यात चालणारी शहर बससेवा ताब्यात घेऊ नये, या भूमिकेवर शिवसेना ठाम असून याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक लवकरच राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने शहर बससेवा ताब्यात घेण्याची मानसिकता तयार केली असून, येत्या महासभेत त्याबाबतचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सर्वेक्षणासाठी क्रिसील या संस्थेची नियुक्ती केली होती. बोरस्ते यांनी क्रिसीलच्याही अहवालाबाबत शंका उपस्थित करत वस्तुस्थिती निराळी असल्याचे सांगितले. शहर बससेवा चालविणे हे महापालिकेचे काम नसून एसटी महामंडळानेच उत्पन्नाचे स्त्रोत शोधून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी लवकरच विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडून शहर बससेवेची सद्यस्थिती समजून घेतली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांचीही भेट घेऊन त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडली जाणार असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. यावेळी शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, संतोष गायकवाड उपस्थित होते. वाहतूक धोरणावर आज कार्यशाळा राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने राज्य नागरी वाहतूक धोरण प्रस्तावित केले असून, त्यात शहरातील सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. या धोरणावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि.२) सकाळी १०.३० वाजता मनपा आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे संचालन राज्य शासनाने नियुक्त केलेल्या आयटीडीपी या संस्थेमार्फत केले जाणार आहे. दरम्यान, या कार्यशाळेत शिवसेना सहभागी होणार नसल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. ‘झेप’मार्फत सर्वेक्षण
शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचे सर्वेक्षण झेप संस्थेच्या वतीने हंप्राठा महाविद्यालयातील पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती झेपचे अध्यक्ष व माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी दिली आहे.
या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहून पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचेही बग्गा यांनी म्हटले आहे.