साल्हेर किल्ल्याच्या शंभर एकर परिसरात साकारणार शिवस्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:57 PM2021-03-07T17:57:31+5:302021-03-07T17:58:16+5:30

सटाणा : नाशिक जिल्ह्यातील शिवशाहीचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी लवकरच शंभर एकराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व शिवसृष्टी निर्माण कार्याला प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा शनिवारी (दि. ६) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी साल्हेर येथे केले.

Shivsmarak to be erected in 100 acres of Salher fort | साल्हेर किल्ल्याच्या शंभर एकर परिसरात साकारणार शिवस्मारक

साल्हेर किल्ल्याच्या शंभर एकर परिसरात साकारणार शिवस्मारक

googlenewsNext
ठळक मुद्देदिलीप बोरसे यांची घोषणा :पहिल्या टप्प्यात ५० कोटींचा प्रकल्प प्रस्तावित करणार

सटाणा : नाशिक जिल्ह्यातील शिवशाहीचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी लवकरच शंभर एकराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व शिवसृष्टी निर्माण कार्याला प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा शनिवारी (दि. ६) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी साल्हेर येथे केले.

आमदार बोरसे यांनी शनिवार दिवसभर किल्ला परिसरची पाहणी केली. साल्हेरच्या गणपती घाट परिसरात असलेल्या ३०० एकर जागेपैकी पहिल्या टप्प्यात १०० एकर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येईल, अशी घोषणा करून जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष किशोर भामरे, भाऊसाहेब अहिरे, बाजार समितीचे संचालक नरेंद्र अहिरे, विनोद अहिरे, हेमंत चंद्रात्रे, डांगसौंदाणे येथील सरपंच सुशील सोनवणे, नामपूर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब भामरे, अरुण भामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश देवरे, नायब तहसीलदार नानासाहेब बहिरम, नायब तहसीलदार नेरकर, मंडळ अधिकारी शिरोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे, रूपेश दुसाने, भूमिलेख अधिक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते .

पहिल्याची दिवशी ११ लाखांची मदत
हा प्रकल्प उभारण्यासाठी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष किशोर भामरे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश आमदार बोरसे यांना देणगी स्वरूपात सुपुर्द केला. त्यानंतर शिवप्रेमी भाऊसाहेब अहिरे, जिल्हा परिषद यतिन पगार यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. आमदार बोरसे यांनी शिवस्मारकाच्या घोषणेच्या पहिल्याच दिवशी ११ लाख रुपयांची मदत गोळा झाली.

असा असेल शिवस्मारक प्रकल्प ...
शंभर एकर परिसरात उंच प्रशस्त चौथाऱ्यावर छत्रपती शिवरायांचा ब्रांझ धातूचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल . त्यांच्या जीवनावर महती, लहान थोर, आबालवृद्धांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी निर्माण केली जाणार आहे. शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचे म्युरलस उभारण्यात येऊन ऐतिहासिक घटनांचे पेंटिंग रेखाटण्यात येणार आहे . म्युझियमचे बांधकाम केले जाणार आहे. ५० व्यक्ती बसू शकतील, अशा अक्षमतेचे लहान चित्रपटगृह उभारून महाराजांवरील जीवनपट दाखविले जाणार आहेत. किल्ल्याच्या तटबंदी प्रमाणे दगडी संरक्षण भिंत, किल्ल्याच्या दरवाजप्रमाणे भव्य प्रवेशद्वार, ठिकठिकाणी अर्धवर्तुळाकार बुरूज व चौकीदार कक्ष बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांच्या प्रतिकृती संग्रहालयदेखील निर्माण करण्यात येणार आहे. शिवसृष्टी परिसरात अंतर्गत सौंदर्यीकरण, ऐतिहासिक, प्रसिद्ध व्यक्तींचे किंवा घटनांचे, युद्धांचे, प्रसंगाचे लहान पुतळे तयार करणे, परिसरात सौर प्रकल्प उभारणे, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारन योजना, भूमिगत गटारी तयार करणे, स्वच्छतागृह बांधणे, म्युझिकल कारंजे तयार करणे, प्रशस्त वाहन तळ साल्हेर किल्ल्याच्या दर्शनासाठी रोपवेची निर्मिती करणे, साल्हेर परिसरातील गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधून तलाव निर्माण करणे व त्यात पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. पर्यटकांच्या मुक्कामाच्या सोयीसाठी दोन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. गार्डनची निर्मिती करून त्यात ग्रीन जीम तयार करण्यात येणार आहे. गुजरातकडील खोल दरीच्या बाजूस कठडे बांधून व्ह्यू पॉइंटची निर्मिती केली जाणार आहे. गणपती व भवानी मंदिरांचा विकासदेखील करण्यात येणार असून स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मितीसाठी व्यापारी संकूल बांधून ऐतिहासिक पुस्तके विक्री केंद्र, ऐतिहासिक मूर्ती ,भित्तिचित्रे, पुतळे विक्री केंद्र, हॉटेल, दुकाने उभारण्यात येणार आहेत. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी कायमस्वरूपी हेलिपॅडची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.

सुरतेवर छापा टाकून आल्यानंतर प्रथमच छत्रपती शिवरायांनी बागलाणच्या साल्हेर किल्ल्याच्या मैदानावर लढाई जिंकून साल्हेर ताब्यात घेतला होता. या लढाईत शिवरायांचे बालपणाचे मित्र सूर्याजी काकडे शहीद झाले होते. सर्वाधिक उंच किल्ला आणि शिवरायांची मैदानावरची एकमेव लढाई असल्यामुळे राज्यातील किल्ल्यांपैकी साल्हेरचे वैशिष्ट्य आहे .यामुळे साल्हेर किल्ल्याला शिवशाहीचा साक्षीदार म्हणून संबोधले जाते. म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी याच मैदानावर आपण महाराजांचे स्मारक व शिवसृष्टी उभारण्याची कल्पना मनात आली.
-दिलीप बोरसे, आमदार

Web Title: Shivsmarak to be erected in 100 acres of Salher fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.