धामधुमीतही शोभा डोखळेंनी स्वीकारला पदभार
By admin | Published: October 9, 2014 10:32 PM2014-10-09T22:32:07+5:302014-10-09T22:32:24+5:30
धामधुमीतही शोभा डोखळेंनी स्वीकारला पदभार
नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या शोभा सुरेश डोखळे यांनी काल गुरुवारी (दि.९) पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या समवेत गटनेते प्रवीण जाधव होते. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना सर्वच पदाधिकारी आपापल्या मतदारसंघात प्रचाराला जुंपलेले असताना अचानक शोभा डोखळे यांनी पदभार स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. २१ सप्टेंबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर २५ सप्टेंबरला पदभार स्वीकारला होता. त्यानंतर ४ आॅक्टोबरला विषय समिती सभापतिपदाची निवडणूक झाल्यानंतर सभापती झालेले केदा अहेर यांनी माजी बांधकाम सभापती अलका जाधव यांच्या कक्षात जाऊन काही वेळ हजेरी लावली होती, तर समाजकल्याण सभापतिपदी निवड झालेल्या उषा बच्छाव यांनी निवडणुकीच्या धामधुमीनंतरच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारू याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली होती. दरम्यान, गुरुवारी दुपारी शोभा डोखळे यांनी गटनेते प्रवीण जाधव यांच्यासह माजी महिला व बालकल्याण सभापती सुनीता अहेर यांच्या कक्षात जाऊन पदभार स्वीकारत काही वेळ हजेरी लावली. दिंडोरी विधानसभेची लढत अटीतटीची झालेली असताना इकडे शिवसेनेच्या सभापतींनी पदभार स्वीकारल्याने त्याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)