कोरोनाच्या निमित्ताने तहसीलमधील झटकली धूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 06:00 PM2020-03-17T18:00:09+5:302020-03-17T18:00:17+5:30
निफाड कार्यालय : तहसीलदारांच्या पुढाकाराने साफसफाई
सायखेडा : कोरोना विषाणूपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून देशभरात विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच कोरोनाच्या निमित्ताने निफाड तहसील कार्यालयातील वर्षांनुवर्षापासूनची धूळ झटकली गेली. तहसीलदार दीपक पाटील यांच्या पुढाकाराने कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
निफाडच्या तहसील कार्यालय आवारात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय, सेतू कार्यालय, पोलीस ठाणे, पोलीस कस्टडी, खरेदी-विक्र ी संघ अशी सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असल्याने या भागात नागरिकांची वर्दळ असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात येत असल्याने तहसील कार्यालयातही वर्दळ कमी करण्यासंबंधी उपाययोजना आखण्यात आल्या. याशिवाय, तहसील कार्यालयात वर्षांनुवर्षांपासून स्वच्छताच केली गेली नसल्याने घाणीचे साम्राज्य होते. शासकीय इमारत, शौचालय, जवळच असणाऱ्या गटारी त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. संकट ही संधी मानून तहसीलदार दीपक पाटील यांनी संपूर्ण तहसील कार्यालयाचीच सफाई करण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार, या परिसरातील जुन्या इमारतीवरील कचरा, शौचालयातील भांडी तसेच परिसरातील केर कचरा, वाहणारे सांडपाणी, यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तहसील कार्यालयातील गाड्यांवरील धूळ झटकण्यात आली.
तहसील कार्यालयाप्रमाणेच तालुक्यातील पिंपळगाव, सायखेडा, चांदोरी, ओझर, लासलगाव या भागातील शासकीय कार्यालये, सरकारी दवाखाने, बस स्थानक आदी ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.