मनसेच्या आंदोलनाचा झटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 02:14 PM2020-11-26T14:14:05+5:302020-11-26T14:23:16+5:30
कोरोना काळातील भरमसाट वीज बिलवाढ त्वरीत रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मनसेच्या राजगड कार्यालयापासून मानवी साखळी आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन, किर्तन करुन वाढीव वीजबिल मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
नाशिक : कोरोना काळातील भरमसाट वीज बिलवाढ त्वरीत रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मनसेच्या राजगड कार्यालयापासून मानवी साखळी आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन, किर्तन करुन वाढीव वीजबिल मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
शासनाने मनसेच्या आंदोलनाला घातलेली बंदी घातली होती. मात्र, माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन मानवी साखळीद्वारे आंदोलन करणार असल्याचे सांगून परवानगी मिळवली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी गुरुवारी जोरदार आंदोलन केले. कोरोना काळात नागरीकांचे उत्पन्नाचे स्त्रोत आधीच आटलेले असताना तर काहींच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले होते. मात्र अशी परिस्थिती असताना नागरिकांना तिप्पट, चौपट वाढीव वीजबिल देणाऱ्या एमएसईबीचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाचा पर्याय निवडण्यात आला होता. मनसेच्या राजगड कार्यालयापासून मानवी साखळी पद्धतीने हे आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आले. मनसेचे नवीन भगवे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सामील व्हा, सामील व्हा धडक मोर्चात सामील व्हा, सामान्यांच्या खिशात खडखडाट आणि ठाकरे सरकारचा वीजबिलांचा गडगडाट यासारखे असंख्य फलक झळकवत आंदोलन केले. वीजबिल विरोधी धडक मोर्चात मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, अनंता सूर्यवंशी, दिलीप दातीर, अंकुश पवार, सुजाता डेरे, मनोज घोडके, अजिंक्य शिंत्रे, शाम गोहाड यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इन्फो
तीन तिघाडा अन लाईट बिल बिघाडा
मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि हाती घेतलेले फलकदेखील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ‘या आघाडी सरकारचे करायचे काय ? खाली डोके वरती पाय’ यासारख्या घोषणांना टाळ,मृदुंगाची जोड देत कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तर काही कर्मचाऱ्यांनी ‘हाती नाही काम आणि एमएसईबीचे तिप्पट दाम’ यासारख्या घोषणांनी लक्ष वेधून घेतले होते. तर ‘तीन तिघाडा अन लाईट बिल बिघाडा’ यासारख्या घोषणांनी तर आसमंत दणाणून गेला होता.