नाशिक त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल लॉज चालकांना धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
By संजय पाठक | Published: December 27, 2023 05:47 PM2023-12-27T17:47:43+5:302023-12-27T17:48:08+5:30
या व्यवसायिकांना व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळली आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे गंडांतर आहे.
नाशिक- त्रंबक रस्त्यावर असलेल्या बेकायदा हॉटेल्स आणि विशेषता लॉजिंग मध्ये चालणाऱ्या उद्योगांविषयी उलट सुलट चर्चा होत असतात. या हॉटेल्स आणि लॉजेसला नाशिक महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच एनएमआरडीएने नोटिसा दिल्या होत्या. त्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या या हॉटेल चालकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. या व्यवसायिकांना व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळली आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे गंडांतर आहे.
दरम्यान, या हॉटेल चालकांनी बांधकामे नियमित करावी यासाठी देखील उच्च न्यायालयाकडे विनंती केली होती त्यानुसार एन एम आर डी ए च्या वतीने त्यांना एक महिन्याची विशेष सवलत देण्यात येणार असून या कालावधीत बांधकामे नियमित करावीत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त सतीश खडके यांनी दिला आहे.
नाशिक शहराच्या आजूबाजूच्या सुमारे सहा तालुक्यांचा परिसर एनएमआरडीए च्या अखत्यारीत येतो त्यामुळे एनएमआरडीने सध्या बेकायदेशीर बांधकामांना नोटीस देण्याचा धडाका लावला आहे. त्रंबक रोडवर अनेक शैक्षणिक संस्था असून या मार्गवरील हॉटेल आणि लॉजेसचा गैरप्रकारांसाठी उपयोग होतो अशा प्रकारच्या तक्रारी आहेत मध्यंतरी ग्रामीण पोलिसांनी या भागात धडाकेबाज मोहिम राबवली होती.
दरम्यान, आता या हॉटेल आणि लॉजच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महिनाभरापूर्वी नोटीस दिल्यानंतर संबंधितांचे धाबे दणाणले होते. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दिलासा मिळू शकला नाही.