श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शहरात जल्लोष
By admin | Published: August 19, 2014 12:59 AM2014-08-19T00:59:24+5:302014-08-19T01:20:40+5:30
क्रांती युवक संघाचा सात ठिकाणी उत्सव
नाशिक : गोविंदा आला रे आला... गोकुळचा कान्हा जरा मटकी सांभाळा... गो-गो गोविंदा... यांसारख्या गीतांच्या तालावर थिरकत शहरात युवा गोविंदांच्या पथकाने गोपाळकाला अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी पारंपरिक पद्धतीत जल्लोषात साजरी केली. यावेळी जुन्या नाशकातील भद्रकाली भाजीबाजार पटांगणावर मानाची सुमारे ३५ फुटी दहीहंडी इगतपुरीच्या गोविंदा पथकाने रात्री ९.३० वाजेच्या सुमारास फोडली.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील तरुणांच्या क्रांती युवक संघाच्या वतीने गंगापूररोडवरील शहीद चौक, प्रसाद सर्कल, भाजीबाजार परिसर, माणिकनगर, एसटी कॉलनी, बीवायके कॉलेजसमोर अशा एकूण सात ठिकाणी सुमारे दहा ते पंधरा फुटी दहीहंड्या गोविंदा पथकाने फोडल्या. दरम्यान, ढोलपथकाच्या तालावर थिरकत जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करत युवकांनी मोठ्या जल्लोषात वरील सर्व ठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडल्या. सर्वप्रथम शहीद चौकातील दहीहंडी फोडण्यापासून सुरुवात करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी तीन ते चार थर गोविंदा पथकाने रचले होते. गेल्या दहा वर्षांपासून या युवकांच्या संघाकडून उपक्रम राबविला जात आहे. दरम्यान, भद्रकाली भाजीबाजार पटांगणावर भद्रकाली युवक मित्रमंडळ व मोहन मास्तर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मानाची सुमारे ३५ फूट उंच दहीहंडी बांधण्यात आली होती. डीजे व ढोलपथकाच्या तालावर थिरकत इगतपुरी येथील युवा गोविंदा पथकाने रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दहीहंडी फोडण्यास यश मिळविले. यावेळी सुमारे आठ ते दहा थर गोविंदा पथकाने रचले होते. दरम्यान, यशस्वी गोविंदा पथकाला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जुन्या नाशकातील शिंपी गल्ली येथील मारुती मंदिरासमोर लहान मुलांच्या गोविंदा पथकानेही काही फूट उंचीवर बांधण्यात आलेली दहीहंडी यशस्वीपणे फोडत गोकुळाष्टमी साजरी केली. त्याचप्रमाणे इंदिरानगर परिसरात चेतनागर, सदिच्छानगर,राजीवनगर, रोहन अपार्टमेंट, औदुंबर अपार्टमेंट, आत्मविश्वास सोसायटी चार्वाक चौक, अलई चौक, पांडवनगरी, विनयनगर मंदिर आदि ठिकाणी विविध सामाजिक मंडळांकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)