धक्कादायक! नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 07:29 AM2018-09-24T07:29:01+5:302018-09-24T13:23:00+5:30
इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नाशिक- इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, तिघेही जखमी आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्रशांत बोरसे हा 60 टक्के भाजला असून, तो गंभीर आहे. इगतपुरीमधील कोपरी मोहल्ला परिसरात दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यातूनच तीन जणांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पूर्ववैमनस्यातून तिघा जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रशांत बंडू बोरसे, दीपक बंडू बोरसे,सुरेश गुप्ता जखमींची नावे. कुणाल किशोर हरकरे याच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील कोकणी मोहल्ला येथे गणपती विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी गणपती विसर्जन करून आल्यानंतर आरोपी कुणाल किशोर हरकरे ( वय २८ ) यानं जखमी प्रशांत ऊर्फ लखन बंडू बोरसे, दीपक बंडू बोरसे यांना तू माझ्याकडे रागाने का बघतो म्हणून शिवीगाळ केली होती. तसेच त्यांच्यात बाचाबाचीही झाली. मात्र यावेळी हा वाद मिटवण्यात आला. दरम्यान रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी कुणाल किशोर हरकरे याने घरातून रॉकेलचे भरलेले कॅन आणून रॉकेलचा बोळा पेटवून प्रशांत बोरसे व त्याचाच भाऊ दीपक बोरसे यांच्या अंगावर फेकल्याने दोघे ही गंभीर भाजले.
या दोघांना वाचवण्यासाठी सुरेश ऊर्फ बबली गुप्ता हे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता तेही गंभीर भाजले. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात दीपक बंडू बोरसे यांनी फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच मिलिंद नगर येथे चाकूहल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला. पोलिसांचे शहरात दुर्लक्ष होत असल्याने शहरात पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.