धक्कादायक! बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखाधिकाऱ्याकडून साडेपाच कोटींचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:31 IST2025-03-27T16:30:30+5:302025-03-27T16:31:04+5:30
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास केला जात आहे.

धक्कादायक! बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखाधिकाऱ्याकडून साडेपाच कोटींचा अपहार
नाशिक : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम जमा न करता ती स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेत तत्कालीन शाखाधिकारी संशयित आरोपी सुभाष विठ्ठल कौटे (४०, रा.संगमनेर) याने तब्बल ५ कोटी ५५ लाख ६६ हजार ५१३ रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास केला जात आहे.
गंगापूररोडवरील थत्तेनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या अॅग्री हायटेक शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी कौटे यांनी १० जानेवारी २०२३ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत त्यांच्या पदाचा गैरवापर करत एकूण ३६ खातेधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करताना संगनमताने बनावट कागदपत्रांच्याआधारे कर्ज मागणीची रक्कम कमी असताना ती जास्त असल्याचे दाखविले. तसेच कर्ज खाते नसतानासुद्धा कर्ज खाते असल्याचे भासवून त्या खात्यात कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम मंजूर करत तीन कर्जदारांच्या बचत खात्यात वर्ग करत एकूण सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा अपहार करत बँकेची व शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी शाखाधिकारी बी. बी. बेहरा यांनी जोखीम आधारित केलेल्या लेखापरीक्षणात हा घोटाळा उघडकीस आला. यानंतर त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. बेहरा यांच्या फिर्यादीवरून कौटे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे या करीत आहेत.
गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जदाराला ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी व पडताळणी झाल्यावर संबंधितांचे कर्ज खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुरू करण्यात येते. या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने तीन वर्षांसाठी कर्जाची रक्कम जमा होत असते. ही रक्कम कर्जदारांच्या कर्ज खात्यात जमा करण्याऐवजी संशयित कौटे याने बचत खात्यात जमा केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत का? तसेच फसवणुकीचा आकडादेखील यापेक्षा अधिक आहे का? याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. फसवणुकीची रक्कम वाढूदेखील शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.