धक्कादायक : विवाहितेच्या प्रियकराने आईसमोर सहावर्षीय बालकाचा घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:17 PM2018-02-26T21:17:00+5:302018-02-26T21:17:00+5:30
नाशिक : शरणपूर गावठाण भागातील एका प्रार्थनास्थळाजवळील मिशन मळा भागात भाडेतत्त्वावर राहणाºया सोनाली ऊर्फ सोनूबाई या विवाहितेच्या प्रियकराने रागाच्या भरात तिच्या पहिल्या नवºयापासून झालेल्या सहा वर्षीय मुलगा नकुल थोरात याला धोपटणीने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित प्रियकर निरंजन ऊर्फ साहील जगप्रसाद चतुर्वेदी फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिशन मळा भागात सोनाली सुधाकर थोरात ही सुमारे वर्षभरापासून भाडेतत्त्वावर राहते. तिचे पहिले लग्न संतोष रमेश जाधव या व्यक्तीसोबत झाले होते. त्यानंतर सोनाली हिला मुलगी नंदिनी, मुलगा विघ्नेश, नकुल अशी तीन अपत्ये त्यांच्यापासून झाली. २०१५ साली सोनाली हिने सुधाकर अशोक थोरात यांच्यासोबत पुनर्विवाह केला. सर्व मुले महिरावणी येथील आश्रमशाळेत शिक्षणासाठी निवासी म्हणून राहत होती. सुटीमध्ये ही मुले सोनाली हिच्या घरी आली होती. सोनाली वर्षभरापासून संशयित चतुर्वेदीसोबत एकत्र राहत होती. दरम्यान, चतुर्वेदी व सोनाली किरकोळ कारणावरून मुलांना सातत्याने मारहाण करीत असल्याची फिर्याद शेजारी राहणाºया एस्तेर सतीश दलाल यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. रविवारी (दि.२५) रात्री सोनाली व तिचा प्रियकर चतुर्वेदी यांनी मुलगी नंदिनी व सहा वर्षीय नकुल यास जबर मारहाण केली. धोपटणीने मारहाण केल्याने नकुल हा रात्रभर अस्वस्थ होता. सोमवारी (दि.२६) सोनाली मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेली असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
असा झाला खुनाचा उलगडा
सोनाली हिने नकुलचा मृतदेह घरी आणला असता गल्लीमध्ये चर्चा झाली व सर्व महिला घरी जमल्या. सोनाली हिने नकुलच्या मृत्यूचे कारण सांगण्यास नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे महिलांचा संशय बळावला व त्यांनी पोलिसांना सदर प्रकाराची माहिती दिली. तसेच नंदिनीच्या शरीरावरही जखमा झाल्या होत्या व तापाने तिची प्रकृती खालावल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी नंदिनीला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून हलविले. पोलिसांनी संशयित सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, फरार संशयित चतुर्वेदीचा पोलीस शोध घेत आहेत.