धक्कादायक! सिनेस्टाइल पाठलाग करताना 'एक्ससाइझ' पथकाच्या वाहनाला उडविले; एक ठार, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:15 AM2024-07-08T11:15:13+5:302024-07-08T11:15:31+5:30
ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड-मनमाड रस्त्यावर जुना हरनुल टोल नाक्याजवळ सोमवारी (दि.८) पहाटे च्या सुमारास घडली.
अझहर शेख, नाशिक : अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग करताना सदर वाहनाने 'एक्ससाइझ'च्या नाशिक भरारी पथकाच्या २ वाहनांना कट मारून उडविले. यामुळे पथकाची सरकारी स्कॉर्पिओ जीप शेतात जाऊन उलटली. यामध्ये जीपचालक जवान कैलास गेनू कसबे (५०) यांचा मृत्यू झाला. तसेच पोलीस जवान राहुल पवार व अजून २ जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड-मनमाड रस्त्यावर जुना हरनुल टोल नाक्याजवळ सोमवारी (दि.८) पहाटे च्या सुमारास घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाला रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचला होता. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा घोटीपासून नाशिक व नाशिक पासून मनमाड पर्यंत सुमारे दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत भरारी पथकाची दोन वाहने या वाहनाच्या मागावर होती. हरनुल टोलनाक्याजवळ वाहनचालकने सरकारी वाहनाला कट मारून उडविले. यावेळी स्कॉर्पिओचे चालक कसबे यांचे नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गावरून एका शेतात जाऊन उलटली. तसेच दुसऱ्या एका खासगी वाहनालाही अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाने कट मारले. सुदैवाने ते वाहन उलटले नाही.
जखमी जवानांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले आहे. नाशिक ग्रामीण पोलीस व एक्ससाइझ विभागाचे दुसरे पथक त्या वाहनाचा शोध घेत आहेत. गुजरात, मध्यप्रदेश सीमावर्ती नाक्यांवर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.