CoronaVirus धक्कादायक! नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी; पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 11:18 PM2020-04-08T23:18:47+5:302020-04-08T23:32:05+5:30
CoronaVirus जिल्ह्यातील मालेगाव येथील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव येथील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी मालेगाव येथे या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे आणखी चार जणांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले आहे.
नाशिक मध्ये आठ दिवसांपूर्वी निफाड येथील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. हा तरुण दुकानामध्ये काम करत होता. त्यानंतर गेल्या सोमवारी नाशिक शहरतील गोविंदनगर भागात देखील एका संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर आता आज जिल्ह्यातील मालेगाव येथील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नाशिक मध्ये कोरोना बधितांची संख्या 7 झाली आहे.
दरम्यान आज राज्यात १२१ नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११४० वर गेली आहे. आज राज्यात ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ५ मुंबईत तर २ पुणे येथे तर प्रत्येकी १ कल्याण-डोंबिवली आणि नाशिकमधील आहेत. काल सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात धारावी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.