धक्कादायक : गोदावरीची उपनदी अरुणा महापालिकेच्या गावीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:19 PM2018-11-01T14:19:03+5:302018-11-01T14:25:46+5:30
गोदावरी-अरुणा संगमाचे पौराणिक महत्त्व लाभलेले आहे. यासोबतच अरुणा नदी रामकुंडात येऊन गोदावरीला मिळते. अरुणाचा उगम रामशेज किल्ल्यावरुन झाल्याचे बोलले जाते. पंचवटीमार्गे अरुणा नदी गोदावरीला येऊन रामकुंडात मिळते.
नाशिक : गोदावरीच्या रामकुंडात अरुणा नदीचा संगम असून या संगमाचे दाखले पुराणापासून बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझिटीयरमध्येही आढळतात; मात्र महापालिकेच्या गावी अरुणा नदी नसून एका माहिती अधिकाराच्या उत्तरात ही बाब उघड झाली आहे. गोदावरी-अरुणाच्या संगमावर रामकुंडात गोमुखातून हजारो भाविक पवित्र जल घेतात. महापालिकेने अरुणा नदीचे अस्तित्व नाकारणे ही गंभीर बाब असल्याचे गोदाप्रेमी सेवा संघटनेचे अध्यक्ष देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गोदावरी-अरुणा संगमाचे पौराणिक महत्त्व लाभलेले आहे. यासोबतच अरुणा नदी रामकुंडात येऊन गोदावरीला मिळते. अरुणाचा उगम रामशेज किल्ल्यावरुन झाल्याचे बोलले जाते. पंचवटीमार्गे अरुणा नदी गोदावरीला येऊन रामकुंडात मिळते. नंदिनी, अरुणा, वरुणा या गोदावरीच्या उपनद्या आहेत; मात्र महापालिकेच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी अरुणा नदीचा गोदावरी संवर्धन कक्षाच्या अभिलेखावर कुठलाही उल्लेख नसल्याचे माहिती अधिकाराच्या उत्तरात सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोदावरी-अरुणा नदीच्या संदर्भात जानी यांनी महापालिकेकडे माहितीच्या अधिकारात अर्जाद्वारे रामकुंडातील गौमुखातून पडणा-या प्रतिदिन पाण्याची मात्रा? रामकुंड ते अरुणा नदीच्या उगमस्थानापर्यंत नदीच्या मार्गावर करण्यात आलेल्या बांधकामाची सविस्तर माहिती? नाशिककरांना अरुणा नदी बघावयाची असल्यास कोठे व कोणत्या परिसरात जाऊन बघता येईल? असे प्रश्न विचारले होते. या सर्व प्रश्नांचे एकच सामुहिक उत्तर ‘अर्जाद्वारे विचारण्यात आलेली माहिती गोदावरी संवर्धन कक्ष विभागाच्या अभिलेखावर आढळून येत नाही’ महापालिकेच्या जन माहिती अधिकाºयांकडून देण्यात आले. बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर, १८८३च्या नकाशामध्ये अरुणा नदी दाखविण्यात आली आहे. सिटी सर्व्हेच्या १९१७ सालच्या मुख्य डीएलआर नकाशात अरुणा नदी दाखविण्यात आली आहे. तसेच वर्षभरापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जानी यांनी महापालिका अधिकारी व आयुक्तांपुढे गोदावरी, उपनद्यांबाबत सादरीकरण केले होते.