Shocking! नाशिकमध्ये धावत्या रिक्षाने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली जीवितहानी
By अझहर शेख | Published: April 7, 2024 02:03 PM2024-04-07T14:03:48+5:302024-04-07T14:04:40+5:30
भर ऊन्हात आग लागल्याने संपूर्ण रिक्षा जळून भस्मसात झाली
अझहर शेख-मनोज मालपाणी, नाशिकरोड: जेलरोडवरून बिटकोच्या दिशेने रविवारी (दि.७) सकाळी जाणाऱ्या प्रवासी रिक्षाने (एमएच१५ जेए २३७७) सानेगुरूजीनगरजवळ अचानकपणे पेट घेतला. सुदैवाने रिक्षामध्ये कोणी प्रवासी नव्हते, तसेच चालकानेसुद्धा प्रसंगावधान दाखविले. यामुळे जीवीतहानी टळली. मात्र आगीत संपूर्ण रिक्षा भस्मसात झाली.
जेलरोड मगर चाळ इथे राहणारे रिक्षाचालक मोहम्मद सुफरान पठाण (५८) हे रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जेलरोडकडून बिटकोच्या दिशेने जात होते. साने गुरुजी नगर महाजन हॉस्पिटल समोरून रिक्षा जात असताना अचानक रिक्षातून काहीतरी जळण्याची दुर्गंधी त्यांना जाणवली. तसेच धुर येऊ लागल्याचेही लक्षात आल्याने पठाण यांनी रस्त्यालगत रिक्षा उभी केली अन् खाली उतरले. क्षणार्धात रिक्षाच्या खालीचल बाजूने आगीने पेट घेतला. काही मिनिटांतच संपुर्ण रिक्षा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यावेळी जेलरोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. घटनेची माहिती अग्नीशमन दलाला कळविण्यात आली; नाशिकरोड उपकेंद्राचा बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण रिक्षा आगीत जळून राख झाली होती. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी रिक्षा मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.