धक्कादायक ! अवघ्या ३६ रुपयांत देत होते 'रोलेट'चे आयडी-पासवर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 01:21 PM2021-07-04T13:21:46+5:302021-07-04T13:27:06+5:30
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७०० रुपये रोख व ३ हजार रुपयांचा मोबाइल जप्त केला. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : मोबाइलवर रोलेट जुगाराचे ॲप्लिकेशन वापरुन अवघ्या ३६ रुपयांत तरुणांना आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देत रोलेटसारख्या जुगारात ढकलणाऱ्या दोघा संशयितांना मुंबईनाका व गंगापूर पोलिसांनी पकडले आहे.
मुंबई नाका पोलिसांनी भारतनगर परिसरात कारवाई करून आसिफ दस्तगीर बागवान (४०) व गणेश एकनाथ डिंडे (सर्व रा. भारतनगर) या दोघांना पकडले. हे दोघेही बुधवारी (दि.३०) दुपारी भारतनगर परिसरात आढळून आले.
दोघांनी त्यांच्याकडील मोबाइलवर ॲप डाऊनलोड करून तरुणांना जुगार खेळण्यासाठी ३६ रुपयांत आयडी व पासवर्ड देत असताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७०० रुपये रोख व ३ हजार रुपयांचा मोबाइल जप्त केला. त्यांच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच गंगापूर पोलिसांनी परवेझ ऊर्फ सोनू जावेद मनियार (१९, रा. शिवाजी नगर), लकी आहेर ऊर्फ भारत वसंत आहेर (रा. दिंडोरी रोड), विशाल आनंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पोलिसांनी परवेझला अटक केली आहे. संशयित ऑनलाईन पद्धतीने रोलेट खेळताना व खेळवताना आढळून आले होते. त्यांच्याकडून ३५० रुपये व १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे.
रोलेट जुगार खेळणारे ताब्यात
पंचशीलनगर येथे पोलिसांनी कारवाई करून रोलेट जुगार खेळवणाऱ्यास ताब्यात घेतले आहे. सिद्धांत गुलाबराव शिराळ (२४, रा. पंचशीलनगर) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
सिद्धांत शिराळ हा मोबाईलवरून रोलेट जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांना आयडी व पासवर्ड देत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी गुरुवारी (दि.१) मध्यरात्री पंचशीलनगर परिसरातून सिद्धांत यास पकडले. त्याच्याकडून ५ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यासह मनोज बैरागीविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.