धक्कादायक : सटाणा, नामपूर बाजार समिती निवडणूक निकाल; कार्यकर्त्यांचा परिसरात जल्लोष प्रस्थापितांना धूळ चारत नवोदितांची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:11 AM2018-06-01T01:11:41+5:302018-06-01T01:11:41+5:30
सटाणा : संपूर्ण कसमादे पट्ट्याचे लक्ष लागून असलेल्या तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत.
सटाणा : संपूर्ण कसमादे पट्ट्याचे लक्ष लागून असलेल्या तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत. बागलाणच्या शेतकऱ्यांनी या निवडणुकीत प्रस्थापिताना धक्का देत नवीन चेहºयांना बाजार समितीचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
सभापतिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या आमदार चव्हाण गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, माधवराव सोनवणे, तसेच जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी रौंदळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील यांना दारुण पराभवाला समोरे जावे लागले. सटाणा बाजार समितीच्या मतमोजणीस येथील प्रशासकीय इमारतीत सकाळी १० वाजता प्रारंभ करण्यात आला, तर नामपूरच्या मतमोजणीस बाजार समितीच्या गुदामात प्रारंभ करण्यात आला. दुपारी १२ वाजता हमाल/मापारी व आडत/व्यापारी मतदारसंघाचे निकाल बाहेर आले. सटाणा बाजार समितीच्या व्यापारी गटाचादेखील धक्कादायक निकाल लागला असून, शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी सर्वाधिक ९५ मते घेऊन बाजी मारली तर समको बँकेचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे ७० मतांनी विजयी झाले. या दोघांनी समको बँकेचे विद्यमान संचालक किशोर गहिवड, अशोक बडजाते यांना चीत केले. त्यांना अनुक्रमे ३३ व ४० मतांवर समाधान मानावे लागले. हमाल/मापारी गटात संदीप दगा साळी ५२ मते मिळवून निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल माणिक देसले यांना २८ मते मिळाली. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सटाणा गणाच्या लढतीत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता कै. बी.एन सोनवणे यांच्या स्नुषा मंगला प्रवीण सोनवणे यांनी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, बागायतचे सभापती माधवराव सोनवणे यांचा दारुण पराभव केला. सौ. सोनवणे यांना ५८१ मते मिळाली तर सोनवणे बंधूंना अनुक्रमे ४२० व ३८७ मते मिळाली. मुंजवाड गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांचाही दारुण पराभव झाला. ते तिसºया क्र मांकावर फेकले गेले. या गणात नवीन चेहरा व सामान्य शेतकरी प्रभाकर रौंदळ यांनी ८८३ मते मिळवून मुंजवाडचे माजी सरपंच गणेश जाधव व शैलेश सूयर्वंशी यांना चीत केले. त्यांना अनुक्रमे ६९७ व ५६० मते मिळाली. चौगाव गणात जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी रौंदळ यांचा निसटता पराभव झाला. त्यांच्यापुढे आमदार चव्हाण गटाचे सुनील निकम, केशव मांडवडे यांनी आव्हान उभे केले होते. यात केशव मांडवडे यांनी ७८५ मिळवून विजय संपादन केला. रौंदळ यांना ७३५ मतांवर समाधान मानावे लागले.
कंधाणे गणात मातीत राबणाºया संजय तुळशीराम बिरारी यांनी ९०७ मते मिळवून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील बिरारी, चौंधाणेचे माजी सरपंच राकेश मोरे यांना पराभवाची धूळ चारली. त्यांना अनुक्रमे ६३१ व ७४० मते मिळाली. डांगसौंदाणे गणात तुळजा भवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे विजयी झाले. त्यांच्या समोर त्यांचे चुलत बंधू रवींद्र विठ्ठल सोनवणे यांनीच आव्हान उभे केले होते. संजय सोनवणे १०७२ मते मिळवून विजयी झाले, तर रवींद्र सोनवणे यांना ९१० मते मिळाली. तळवाडे दिगर येथील कपालेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंकज अशोक ठाकरे या तरुणाने सर्वाधिक १५७६ एवढे मताधिक्य मिळवून विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी बाजीराव अहिरे यांना चीत केले. त्यांना अवघ्या ६२९ मतांवर थांबावे लागले. अजमीर सौंदाणे गणात बाजीराव देवरे यांनी १२९५ मतांनी विजय मिळविला. त्यांनी विजय पवार यांचा पराभव केला.