घंटागाडी ठेकेदारांना सव्वादोन कोटींचा दंड

By admin | Published: March 21, 2017 12:23 AM2017-03-21T00:23:18+5:302017-03-21T00:23:48+5:30

कारवाई : करारनाम्यातील नियमांचे उल्लंघन

Shockwave penalty for Ghantagadi contractor | घंटागाडी ठेकेदारांना सव्वादोन कोटींचा दंड

घंटागाडी ठेकेदारांना सव्वादोन कोटींचा दंड

Next

नाशिक : घंटागाडीला जीपीएस यंत्रणा न लावणे, वेळेवर संबंधित प्रभागात गाड्या न पोहोचणे यांसह करारनाम्यातील विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घंटागाडी ठेकेदारांना महापालिकेने २ कोटी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदर दंड हा ठेकेदारांच्या अनामत रकमेसह देयकांमधून वसूल केला जाणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.
महापालिकेने आॅक्टोबर २०१६ मध्ये नव्याने घंटागाड्यांचा ठेका दिला आणि २० डिसेंबरला नवीन घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. स्थायी समितीने दिलेल्या आदेशानुसार सर्वच्या सर्व २०६ नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणण्याचे बंधन ठेकेदारांना घालण्यात आले. त्यानुसार, चारपैकी तीन ठेकेदारांनी नवीन घंटागाड्या टप्प्याटप्प्याने रस्त्यावर आणल्या मात्र, सिडको व पंचवटी विभागाचा ठेका घेणाऱ्या जीटी पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराने नवीन घंटागाड्या आणण्यास विलंब लावला. त्यामुळे महापालिकेने गेल्या दोन महिन्यांत जीटी पेस्ट कंट्रोलकडून झालेल्या उल्लंघनप्रकरणी सिडकोसाठी १ कोटी १० लाख ५४ हजाराचा तर पंचवटी विभागातील घंटागाड्यांसाठी ७४ लाख १३ हजाराचा दंड ठोठावला आहे. त्याखालोखाल पश्चिम विभागातील वॉटर ग्रेस या ठेकेदारास ८ लाख ३२ हजार, पूर्व विभागातील सय्यद असिफअली यास ७ लाख ६७ हजार तर सातपूर विभागातील घंटागाड्यांसाठी १० लाख ९९९ रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच नाशिकरोड विभागातील तनिष्क सर्व्हिसेस या ठेकेदारालाही २ लाख ९ हजाराचा दंड करण्यात आला आहे. घंटागाड्यांना करारनाम्यानुसार जीपीएस यंत्रणा न बसविणे, प्रभागात वेळेत घंटागाड्या न पोहोचणे, घंटागाड्याच नसणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: Shockwave penalty for Ghantagadi contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.