कौळाणेत पाण्यासाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन
By admin | Published: March 19, 2017 11:27 PM2017-03-19T23:27:18+5:302017-03-19T23:27:40+5:30
पाणीटंचाई : गिरणा- उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पूनद धरणातुन गिरणा उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. मात्र सदरचे पाणी केवळ सौंदाणे गावापर्यंतच पोहचले. उर्वरित अकरा गावांना पाणीच मिळाले नसल्यामुळे गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे.
तालुक्यातील कौळाणे येथील जलकुंभावर चढून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आंदोलनामुळे सौंदाणेसह अकरा गावांचा पाणीप्रश्न चिघळला आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी प्रांताधिकारी अजय मोरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी धाव घेवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन मागे घ्या असे सांगितले. मात्र आंदोलनकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.तालुक्यातील सौंदाणेसह नांदगाव, वाके, मुंगसे, टाकळी, मांजरे, शिरसोंडी, सोनज, कौळाणे, नगाव, वऱ्हाणे आदि गावांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अजय मोरे यांनी सौंदाणेसह टंचाईग्रस्त गावांची पाहणी करुन सद्यस्थितीतील उपलब्ध जलस्त्रोतांचा आढावा घेतला होता. त्यानंतर पूनद धरणातुन गिरणा उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. मात्र सदरचे पाणी केवळ सौंदाणे गावापर्यंतच पोहचले. उर्वरित गावांना पाणीच मिळाले नसल्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील कौळाणे येथे जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रांताधिकारी मोरे, गटविकास अधिकारी पिंगळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. या आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती भरत पवार, बाजार समितीचे संचालक संग्राम बच्छाव, अध्यक्ष पंकज गायकवाड, समाधान शेवाळे, कौतिक सोनवणे, शिवाजी पवार, रमेश बच्छाव, सचिव भरत पवार, नितीन निकम यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)