गुटखा विक्रीप्रकरणी तीनदा कारवाई झालेल्या दुकानदारावर आता थेट मोक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:19 PM2024-01-04T16:19:10+5:302024-01-04T16:20:50+5:30
धर्मराव आत्राम, शाळेच्या ५०० मीटर आवारात कारवाईसाठी समिती.
नाशिक : गुटखा बंदीसाठी शासनाची भूमिका कडक आहे. आतापर्यंत आम्ही ७० कोटी रुपयांचा अवैध गुटखा पकडला आहे. शाळापरिसरात ५०० मीटरवर असणाऱ्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाईसाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. अवेध गुटखा विक्रीप्रकरणी तीनदा कारवाई झाल्यास संबंधित विक्रेत्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाईची घोषणा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केली.
नाशिक येथे आयोजीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विभागातील पाच जिल्हे आणि आता पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा या बैठकीत घेतला. पीपीपी तत्वावर लॅब तयार करून भेसळ तपासण्यासठी यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. सध्या ३ लॅब्स कार्यरत असल्याने नमुने तपासणीसह कारवाईस उशिर होत असल्याची बाब मान्य करीत त्यावर उपाययोजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे, या विभागात ५०० जणांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. १० फिरत्या प्रयोगशाळा प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. हॉटेल मधील खराब अन्नाच्या पाश्व'भूमीवर बोलताना स्वच्छ जेवण देण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
मालेगावमधील कुत्ता गोली प्रकरणी सर्व जणांवर कारवाई निश्चित असल्याचे ते म्हणाले. दिवाळीत आढळलेल्या बनावट पनीर आणि मिठाईसंदर्भात लोकांनी तारीखसह इतर बाबी बघितल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. यासंदर्भात काही माहिती असेल तर टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा, कारवाई नक्की होईल असे आवाहनही त्यांंनी केले. जितेंद्र आव्हाड यांना आपण ओळखत नाही असे म्हणून त्यांनी त्यावर भाष्य टाळले.
ऑनलाईन औषधविक्रीवर नजर:
डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसतानाही ऑनलाईन पद्धतीने औषधांची केली जाणारी विक्री धोकादायक असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता त्यावरही अंकूश आणणार असल्याचे सांगत प्रिस्क्रिप्शन नसताना औषधे दिल्यास अशा दुकानदारांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.