शॉपिंग सेंटर, सलून बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:38 PM2020-05-04T22:38:50+5:302020-05-04T22:55:21+5:30
नाशिक : अटी-शर्तींच्या अधीन राहून रेड झोनमधील दुकाने उघडली जाणार असून, शहरातील मॉल्स, शॉपिंग सेंटर आणि सलून मात्र बंदच राहणार आहे. दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी डिस्टन्स नियमांचे पालन झाले नाही तर प्रसंगी सवलत रद्द होण्याची नामुष्कीदेखील येऊ शकते.
नाशिक : अटी-शर्तींच्या अधीन राहून रेड झोनमधील दुकाने उघडली जाणार असून, शहरातील मॉल्स, शॉपिंग सेंटर आणि सलून मात्र बंदच राहणार आहे. दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी डिस्टन्स नियमांचे पालन झाले नाही तर प्रसंगी सवलत रद्द होण्याची नामुष्कीदेखील येऊ शकते. नागरिकांनी लागलीच एकाचवेळी बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
नाशिक महापालिका क्षेत्र हे रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे नाशिककरांची जबाबदरी मोठी आहे. शासनाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार येथील दुकानांबाबत काहीशी शिथिलता दिली आहे, मात्र सुरक्षिततेचे नियम मात्र बंधनकारक करण्यात आले आहे.
नाशिक रेडझोनमध्ये असले तरी सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी तूर्तास नाकारली आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर मात्र खुले होणार नाही. शॉपिंग सेंटरमध्ये पाचपेक्षा अधिक दुकाने असतील तर असे शापिंग सेंटर खुले होणार नाही. मात्र त्यात अत्यावश्यक सेवेची दुकाने असतील तर ती मात्र खुली होतील. ज्या शॉपिंग सेंटरमध्ये पाचच दुकाने आहेत ती पाचही दुकाने सुरू होऊ शकतील. जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता सराफा व्यावसायिक, कापड दुकाने, सलूनची दुकाने मात्र बंदच राहणार आहेत. दुकानांबाहेर पाचपेक्षा अधिक ग्राहक उभे राहणार नाही याची काळजी दुकानदारांनी घेणे अपेक्षित आहे. नाशिककरांना कामावर जाता येईल, मात्र दुचाकीवर एकच म्हणजे पाठीमागे कुणीही नको असा नियम करण्यात आलेला आहे. चारचाकी वाहनात मागच्या सीटवर दोनच व्यक्ती असाव्यात, येत्या १७ पर्यंत कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोन म्हणजे बाधित रुग्ण आढळल्यानंतर जो भाग कंटन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे अशा भागात नव्याने कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. या झोनमधील दुकाने हे बंदच राहणार असून, अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली असतील.
--------------
बारा तास दुकाने उघडी राहणार
मालेगावात ५५ कंटन्मेंट झोन आहेत. आॅरेंज झोनमध्ये दुकाने पूर्वीप्रमाणेच खुली राहाणार आहेत. आॅरेंज झोनमधील व्यक्ती परजिल्ह्यात, राज्यात जाऊ शकते. जिल्ह्यातील आठ तालुके आॅरेंज झोनमध्ये आहेत. पूर्वीच्या आदेशाप्रमाणेच सकाळी ७ ते रात्री ७ यावेळेत येथील दुकाने सुरू राहणार आहेत.