ऑक्टोबरपासून रेमेडिसीवरची खरेदीच बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:26+5:302020-12-12T04:31:26+5:30
स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (दि. ११) सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा प्रकार वैद्यकीय अधीक्षक डॉ. ...
स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (दि. ११) सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा प्रकार वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनीच सांगितला. महापालिकेच्या एका नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली असून, बिटको रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहे; मात्र इंजेक्शन्स संपल्याचे त्यांना सांगण्यात येत असल्याचे राहुल दिवे यांनी सांगितले. महासभा आणि स्थायी समिती कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी अगदी कार्योत्तर मंजूर करत असताना रुग्णालयात औषधाचा साठा का उपलब्ध नाही, असा प्रश्न केला. त्यावर डॉ. नागरगोजे यांनी सांगितले की, शासनाने अत्यावश्यक असेल तरच या रेमेडिसीवरचा वापर करा, असे निर्देश दिल्याने ऑक्टोबरपासून महापालिकेने औषध खरेदी बंद केली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयांतून इंजेक्शन आणली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरेाना काळात ॲन्टिजेन टेस्ट खरेदीसाठी कार्योत्तर खरेदीला पुन्हा एकदा मंजुरी देण्यात आली. यापूर्वी अडीच कोटींच्या किट खरेदीला मान्यता दिल्यानंतरदेखील हा स्थायी समितीने प्रस्ताव काही शंका व्यक्त करून दप्तरी दाखल केला हेाता. आयुक्तांच्या विशेेषाधिकारात २५ लाख रुपयांपर्यंतचीच खरेदी अनुज्ञेय असताना केाट्यवधी रुपयांची खरेदी झाल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला होता; मात्र लेखा परीक्षण विभागाने त्यास आक्षेप घेतल्याने तो पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुसार किट आणि औषध खरेदीस मान्यता देण्यात आली.
इन्फो...
मुलतान पुरामध्ये ओपीडी सुरू होणार
महापालिकेच्या मुलतानपुरा रुग्णालयात पुढील आठवड्यापासून ओपीडी सुरू करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांनी दिली. समिना मेमन यांनी स्थायी समितीने आदेश देऊनदेखील रुग्णालय सुरू झाले नसल्याचा आक्षेप घेतला होता.