सिन्नरला जीवनावश्यक सेवा वगळता दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:51+5:302021-04-07T04:14:51+5:30
सिन्नर : शहर व तालुक्यात ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध लागू केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात ...
सिन्नर : शहर व तालुक्यात ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध लागू केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सिन्नर शहर व तालुक्यात शुकशुकाट सुरू होता. दवाखाने, औषध दुकाने, किराणा दुकाने, पिठाच्या गिरण्या, फळविक्रेते यांची दुकाने सुरू होती. तर हॉटेलमधून केवळ पार्सल सेवा पुरविण्यात येत होती.
‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली शासनाने एकप्रकारे लॉकडाऊन लावल्याची संतप्त प्रतिक्रिया इतर व्यावसायिकांनी दिली. कापड विक्रेते, शिवणकाम करणारे, कटलरी दुकाने यांच्यासह जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने गर्दी निम्म्यापेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. बॅँका व इतर आर्थिक व्यवहारासाठी नागरिक आल्याचे दिसून येत होते. शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आल्याने बसची गर्दी कमी झाली होती. बसला प्रवासी कमी मिळाल्याने बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्याची माहिती सिन्नर आगारातून देण्यात आली. प्रवाशांची संख्या अशाच पद्धतीने घटल्यास येत्या दोन-तीन दिवसात बसफेऱ्या निम्म्यावर येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाऊन होण्याची धास्ती अनेक व्यावसायिकांनी घेतली होती. मात्रए शासनाने ‘ब्रेक द चेन’ नावाने नवीन मिशन हाती घेतले असले तरी याबाबत व्यावसायिकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. तर काहींकडून या ब्रेक द चेनचे समर्थन केले जात होते. नवीन नियमावलीबाबत अनेक व्यावसायिक व नागरिकांमध्ये संभ्रम होता. नवीन नियम नेमके काय असणार याबाबत अनेकांकडून एकमेकांकडे विचारणा केली जात होती. मंगळवारी सकाळी अनेकांनी दुकाने उघडली. नंतर पुन्हा बंद केली. मात्रए दुपारनंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गर्दी निम्म्यापेक्षा कमी झाल्याचेही दिसून आले.
इन्फो...
दातली येथे तीन विवाह सोहळ्यांवर धाड; २५ हजारांचा दंड वसूल
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असताना विवाह सोहळ्यांना ५० पेक्षा जास्त लोक येत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात प्राप्त होत होत्या. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. नायब तहसीलदार नितीन गर्जे, दत्ता सोनवणे, विशाल धुमाळ, राजेंद्र खडसाळे, मुरलीधर चौरे, रवींद्र लोखंडे यांची या पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक सुटीच्या दिवशीही कार्यरत राहणार आहे. दातली येथे साखरपुड्यासह विवाह सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या विवाह सोहळ्यासाठी परवानगी काढण्यात आली नव्हती. ५० पेक्षा जास्त व्यक्ती या विवाह सोहळ्यात असल्याचे समजल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हे पथक दातली येथे पोहोचले. तीन विवाह सोहळ्यात नियमापेक्षा जास्त गर्दी असल्याने या दोन विवाह सोहळ्यांच्या आयोजकांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड करण्यात आला. तर तिसऱ्या विवाह सोहळयात ७० ते ८० व्यक्ती असल्याने त्यांना ५ हजारांचा दंड करण्यात आला. तीन विवाह सोहळ्यांच्या आयोजकांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे ५० व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती विवाह सोहळ्यात आढळून आल्यास या पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले.
चौकट-
५ पथके व १५ नोडल अधिकारी
सिन्नर शहर व तालुक्यात जीवनावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, सिन्नर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे व वावी पोलीस ठाणे यांचे प्रत्येकी एक पथक अशी पाच पथके ब्रेक द चेन यात काम करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. याशिवाय १५ नोडल अधिकारी गावोगावी बारीक लक्ष ठेवून असणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यात मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
वावी येथे २ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल
ब्रेक द चेन यात आठवडे बाजार बंद असणार आहे. तथापि, वावी येथे काही भाजीपाला विक्रेत्यांकडून नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे नोडल अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांच्यासह महसूल व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक बाजारतळावर गेले. विनामास्क व आठवडे बाजारत दुकान लावल्यामुळे व्यावसायिकांकडून २ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांनी दिली.
चौकट-
संस्थात्मक विलगीकरणावर भर देणार
सिन्नर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावोगावी कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिली. गावोगावी जिल्हा परिषद शाळेत हे विलगीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी केले आहे.
फोटो ओळी- ०६ सिन्नर २
सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व सरस्वती पुलावर शुकशुकाट.
फोटो ओळी- ०६ दातली१
दातली येथे विवाह सोहळ्यात गर्दी आढळून आल्याने कारवाई करताना तहसील कार्यालयाचे गस्ती पथक.
फोटो ओळी- ०६वावी१
वावी येथे आठवडे बाजाराच्या दिवशी कारवाईसाठी गावातून फिरताना पंचायत समिती, महसूल, पोलीस यांचे संयुक्त पथक.
===Photopath===
060421\06nsk_28_06042021_13.jpg~060421\06nsk_29_06042021_13.jpg~060421\06nsk_30_06042021_13.jpg
===Caption===
सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व सरस्वती पुलावर शुकशुकाट.~दातली येथे विवाह सोहळ्यात गर्दी आढळून आल्याने कारवाई करतांना तहसील कार्यालयाचे गस्ती पथक.~वावी येथे आठवडे बाजाराच्या दिवशी कारवाईसाठी गावातून फिरतांना पंचायत समिती, महसूल, पोलीस यांचे संयुक्त पथक.