आता रात्री दहा वाजेपर्यंत दुकानांना मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 01:41 AM2021-08-12T01:41:10+5:302021-08-12T01:42:15+5:30
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने नव्याने मार्गदर्शक सूचना लागू केल्या असून, त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने आता रात्री अकरा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य शासनाने दुकाने, मॉल्स, जिम तसेच उपाहारगृहांबाबत दिलेले आदेश नाशिक जिल्ह्यालाही लागू असणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक: ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने नव्याने मार्गदर्शक सूचना लागू केल्या असून, त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने आता रात्री अकरा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य शासनाने दुकाने, मॉल्स, जिम तसेच उपाहारगृहांबाबत दिलेले आदेश नाशिक जिल्ह्यालाही लागू असणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने मागील आठवड्यातच दुकानांची वेळ वाढवून देण्यात आली होती आता त्यात पुन्हा सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. दुकानांची वेळ रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आल्यामुळे व्यापार, उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. सर्व प्रकारची दुकाने यापुढे रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. शॉपिंग मॉलदेखील रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत. वातानुकूलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम, योगासेंटर, सलून-स्पा हे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. उपाहारगृहेदेखील ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे.
इनडोअर स्पोर्ट्सलादेखील परवानगी देण्यात आली असली तरी बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्कवॅश, पॅरलल बार, मल्लखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरू राहाणार आहे. विवाह सोहळे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी असेल. मात्र जास्तीत जास्त २०० व्यक्तींचीच उपस्थिती असेल, अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.
--इन्फो--
सिनामागृहे मल्टिप्लेक्स बंदच
सिनेमा, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स सुरू करण्यास मात्र अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. पुढील आदेशापर्यंत ही आस्थापने बंदच राहाणार आहे. धार्मिक स्थळांनादेखील पुढील आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. आंतरराज्य प्रवासासाठी मात्र ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अथवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक आहे.
---कोट--
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मागील बैठकीमध्येच आपण राज्य शासन वेळोवेळी देईल ते निर्देश नाशिक जिल्ह्यामध्ये जसेच्या तसे लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार राज्याने लागू केलेले निर्बंध जिल्ह्यात लागू करण्यात येत आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी