जडीबुटीवाल्यांची रस्त्यावरच दुकाने
By admin | Published: August 4, 2015 10:51 PM2015-08-04T22:51:05+5:302015-08-04T22:51:52+5:30
जडीबुटीवाल्यांची रस्त्यावरच दुकाने
नाशिक : साधुग्राममध्ये भाविकांची गर्दी वाढत असताना विविध विक्रेत्यांनी गाळ्यांमध्ये दुकाने थाटण्यात सुरुवात केली आहे; परंतु अधिकृत विक्रेत्यांप्रमाणे रस्त्याच्या कडेलाच जडीबुटी, नानाविध माळा, शंख, दिवे आदिंची विक्री करणाऱ्या महिला व पुरुषांनी दुकाने थाटली आहेत.
पदपथावरच विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. साधुग्राममधील मुख्य रस्ते विशेषत: लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील चौकात मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उत्तर भारतातून तसेच खान्देशातून आलेले जडीबुटी विक्रेते, तसेच शंख, रुद्राक्ष माळा, तुळशीच्या माळा, दिवे, विविध देवदेवतांच्या धातूच्या आणि दगडाच्या छोट्या-छोट्या मूर्ती हातात आणि पायातील धातूचे कडे, खडे व अंगठ्या आदिंची विक्री करणाऱ्या महिला-पुरुषांनी खाली बसून दुकाने लावली आहेत. त्यामुळे या भागात रहदारीस अडथळा होत आहे. कारण भाविक पदपथावर अतिक्रमण झाल्याने मुख्य रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून मार्गक्रमण करताना दिसतात. (प्रतिनिधी)