औद्योगिक वसाहतीत बंदला अल्प प्रतिसाद
By admin | Published: September 2, 2016 11:34 PM2016-09-02T23:34:46+5:302016-09-02T23:34:57+5:30
औद्योगिक वसाहतीत बंदला अल्प प्रतिसाद
सातपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतून फारसा प्रतिसाद मिळाला नाही; मात्र सीटूप्रणीत युनियन असलेल्या उद्योगातील कामगार या संपात सहभागी झाल्याने काहीप्रमाणात दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.
कामगार कायद्यातील कामगार व मालकधार्जिणे बदल रद्द करावे, खासगीकरण, कंत्राटीकरण, आउटसोर्सिंग धोरण मागे घेण्यात यावे, केंद्र व राज्यातील जिल्हा परिषद आणि मनपातील ११ लाख रिक्त पदे त्वरित भरण्यात यावेत, बंद उद्योग सुरू करण्यात यावेत, बेरोजगारांना काम मिळावे, शिक्षणाचा बाजार बंद करण्यात यावा, किमान वेतन १८ हजार निश्चित करावे, पेन्शन नसलेल्या ज्येष्ठांना तीन हजार पेन्शन देण्यात यावी, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय, पेन्शन योजना यासाठीचा निधी सट्टा बाजारात गुंतविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, यांसह विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले होते.
सीटू वगळता अन्य संघटनांनी या संपात सहभाग घेतला नसल्याने या संपाला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे उत्पादन प्रक्रि या सुरळीत सुरू होती; मात्र सकाळी अंबडच्या एक्सएलओ पॉइण्ट आणि गरवारे चौफुलीजवळ कामावर जाणाऱ्या कामगारांना अडविण्याचा प्रयत्न झाला होता. (वार्ताहर)