खासगी रुग्णालयांना तुटवडा मात्र प्रशासनाचा पूर्ततेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:39+5:302021-04-10T04:14:39+5:30
नाशिक : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या दाव्यानुसार जिल्ह्यात ४४ मेट्रिक टन ऑक्सिजन ...
नाशिक : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या दाव्यानुसार जिल्ह्यात ४४ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असून, तेवढ्या ऑक्सिजनची पूर्तता केली जात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी काही खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येऊ लागल्याने त्यांना ऐनवेळी रुग्ण इतरत्र हलवावे लागले. शुक्रवारीही अन्य काही खासगी रुग्णालयांना पुढील ऑक्सिजन सिलिंडर्स कधी मिळतील, याचीच चिंता लागली आहे. मात्र, त्याचवेळी जिल्हा प्रशासनातर्फे मात्र सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा अखंडितपणे पुरवठा होण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचा दावा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केला आहे. त्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा ऑक्सिजन पुरवठा सनियंत्रण अधिकारी डॉ. किशोर श्रीवास यांना घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना ऑक्सिजन बेडची उपलब्धता व तेथील ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता, कोविड उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयात संबंधित यंत्रणेने ऑक्सिजनचा पुरेसा साठा तत्काळ उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे संबंधित रुग्णालयांनी जम्बो सिलिंडरचे रूपांतर ड्युरा सिलिंडरमध्ये करण्यासाठी उपाययोजना करणे, या बाबींवर डॉ. श्रीवास यांच्याकडून दैनंदिन नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित अतिरिक्त ५० ड्युरा सिलिंडर उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे.
इन्फो
अखंडित पुरवठ्याचे निर्देश
ऑक्सिजन पुरवठा सनियंत्रण अधिकारी म्हणून डॉ. श्रीवास यांनी दररोज किमान एका रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठ्याचा तसेच नियमानुसार ऑक्सिजनच्या वापराबाबत आढावा घेण्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच काही त्रुटी आढळल्यास २४ तासांमध्ये त्यांचे निराकरण करून रुग्णालयांना अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा वापर करण्याच्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालयांनी आपली साठवणुकीची क्षमता वाढवावी, असे आवाहनही मांढरे यांनी केले आहे.