नांदगावी मंजूर मागणीपेक्षा जास्त युरिया मिळूनही टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:24 PM2020-07-15T21:24:25+5:302020-07-16T00:15:07+5:30
नांदगाव : तालुक्यासाठी मंजूर मागणीपेक्षा १७८१ टन जादा युरिया मिळूनही टंचाईला तोंड देण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. खतविक्रे ते मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याची ओरड करत आहेत, तर शेतकरी पिकांना युरियाची मात्रा देण्यास उशीर झाल्यास उत्पन्नावर परिणाम होईल म्हणून चिंताग्रस्त आहेत.
नांदगाव : ( संजीव धामणे ) तालुक्यासाठी मंजूर मागणीपेक्षा १७८१ टन जादा युरिया मिळूनही टंचाईला तोंड देण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. खतविक्रे ते मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याची ओरड करत आहेत, तर शेतकरी पिकांना युरियाची मात्रा देण्यास उशीर झाल्यास उत्पन्नावर परिणाम होईल म्हणून चिंताग्रस्त आहेत. खते कमी पडत असतील तर कृषी विभागाने कोणत्या आधारावर खतांची मागणी नोंदविली हा संशोधनाचा विषय आहे. या आठवड्यात झालेल्या पावसाने पिके तरारली आणि शेतकरी खूश होऊन युरिया खरेदीसाठी बाजारात गेला असता, युरियाची टंचाई झाल्याने त्याच्या आनंदावर पाणी पडले आहे. खतविक्रेत्याकडे गेले की, मागणीपेक्षा कमी गोण्या घेण्याचा आग्रह होत आहे.
पिके अधिक जोमाने मागणीपेक्षा जास्तीचा युरिया मिळूनसुद्धा टंचाई कशी, यात कोणाचे चुकले की वेगळे काही घडले याचे गौडबंगाल आहे. युरियात एन (नायट्रोजन) पी (फॉस्फरस) के (पोटॅशियम) हे घटक ४६:०:० असे असतात. नायट्रोजनमुळे प्रकाशसंश्लेषण क्रि या गतिमान होते. त्यामुळे पीक दमदार होते. वनस्पतींमध्ये हिरव्या पानाची वाढ व हिरवा गर्द रंग युरियामुळे येतो. युरिया मारल्यानंतर पीक अधिक जोमाने येते.
कृषी विभागाकडून 5215 टन युरिया
युरियाची तालुका कृषी खात्याने खरीप हंगामासाठी नोंदवलेली मागणी ४९८१ टन आहे. मंजूर झालेला युरिया ३४३४ टन. प्रत्यक्ष मिळालेला युरिया ५२१५ टन. मग टंचाई कशामुळे निर्माण झाली. मागणीपेक्षा २३४ टन युरिया अधिक मिळाला. यात कृषी विभागाने मागणी कमी केली की युरियाला वाट फुटली अशी चर्चा होत आहे.
-------------------
शासकीय अनुदान असल्याने १२०० रुपयांची युरियाची गोणी २६६ रुपयांना मिळते. परंतु काही खतांसाठी १०७५ ते ११५० रुपये मोजावे लागतात. म्हणून युरियाची मागणी वाढली आहे. इतर खते न वापरल्यामुळे मका पिकावर स्फुरद, लोह, झिंक यांची कमतरता जाणवत आहे. - जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी