आताच लसींचा तुटवडा; मे मध्ये उडणार झुंबड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:11+5:302021-04-27T04:15:11+5:30

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे नाशिकला लसींचा तुटवडा जाणवत आहे. सध्यादेखील नाशिक जिल्ह्यात केवळ ५ दिवस पुरेल इतका लसींचा ...

Shortage of vaccines right now; The rush to fly in May! | आताच लसींचा तुटवडा; मे मध्ये उडणार झुंबड !

आताच लसींचा तुटवडा; मे मध्ये उडणार झुंबड !

googlenewsNext

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे नाशिकला लसींचा तुटवडा जाणवत आहे. सध्यादेखील नाशिक जिल्ह्यात केवळ ५ दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, ३० एप्रिलला हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार त्याची प्रशासनालादेखील माहिती नाही. अशा परिस्थितीत १ मेपासून जेव्हा १८ वर्षांवरील सर्वांना लसीचा नियम अमलात येईल त्यावेळी तर लसीकरण केंद्रांवर प्रचंड झुंबड उडणार असून, सध्या भासणाऱ्या तुटवड्यापेक्षाही अधिक दर दोन दिवसांत ठणठणाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा सातत्याने चार-पाच दिवसांत संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून लस कितपत उपलब्ध होईल, त्याची माहितीदेखील प्रशासनाकडे उपलब्ध नसते. जिल्ह्यात प्रारंभी केवळ ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. तरीदेखील सातत्याने काही केंद्रांवर लस आहे, काही केंद्रांवर नाही, कुठल्या केंद्रांवर लस सकाळी आहे, दुपारी संपली, काही केंद्रांवर दिवसभरच नाही असा अनुभव नागरिकांना गत तीन महिने सातत्याने घ्यावा लागत आहे. नाशिकमध्ये दिवसभरात उपलब्ध साठ्यातून दिवसाला १६ ते २० हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे.

इन्फो

लसीकरणासाठी रांगा

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाकडे पाहून घाबरलेल्या नागरिकांनी आता लसीकरणासाठी रांगा लावल्याचे दृश्य सर्वच लसीकरण केंद्रांवर दिसून येत आहे. नागरिक नोंद केल्यानंतर सकाळी लवकरच रांगेत उभे राहून लसीकरण करून घेण्यास प्राधान्य देत आहेत, तर ज्यांचा लसीचा पहिला डोस एक महिन्यापूर्वीच झाला आहे, असे नागरिकदेखील दुसऱ्या लसीसाठी घाई करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच १ मेपासून प्रचंड मोठ्या रांगा आणि झुंबड उडणार असल्याची लक्षणे आताच दिसून येत आहेत.

अवघे ४ टक्के लक्ष्य पूर्ण

प्रारंभी केवळ आरोग्य कर्मचारी आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जात होती. त्यावेळी लसीबाबत साशंकता असल्याने लसीसाठी नागरिकांना बोलावण्यास कष्ट पडत होते. मात्र, शासन आदेशानुसार ४५ वयाच्या वरील सर्व नागरिकांसाठी मनपाच्या वतीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे; परंतु अनेक नागरिक लस घेण्यासाठी सकाळी सात वाजेपासून रांगा लावत असल्याने ही चिंतेची बाब निर्माण झाली आहे. लसीकरणाची वेळ ही सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत आहे; परंतु असे असतानाही नागरिक मात्र लस लवकर मिळावी यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रात सकाळपासूनच रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निम्मे नागरिक हे ज्येष्ठ नागरिक असल्याचेही निदर्शनात येत आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे आताच कठीण जात आहे. आतापर्यंतच्या ३ महिन्यांत लस देण्याची जी वयोमर्यादा देण्यात आली, त्यातील एकूण लोकसंख्येपैकी अवघे ४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

इन्फो

लसीकरणानंतरही हवी आरोग्यदायी जीवनशैली

कोविड लसीकरणासाठी रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम असण्‍यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणेदेखील आवश्यक आहे. एका संशोधनानुसार दररोज पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांमध्‍ये पुरेशी झोप घेणाऱ्यांच्‍या तुलनेत लसीकरणाचा अर्धा प्रभाव दिसून आला. हेच समीकरण कोविड लसीकरणाबाबतही लागू पडू शकते. त्यामुळेच कोविड लसीकरणानंतरही नागरिकांनी सक्रिय राहणे, व्‍यायाम करणे, तसेच पुरेशी झोप घेणे हाच लसीकरणाचे चांगले परिणाम कायम ठेवण्याचा मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शारीरिकदृष्‍ट्या तंदुरुस्‍त आणि आरोग्‍यदायी जीवनशैली राखल्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारच्‍या गंभीर आजारांचा धोका कमी होण्‍यामध्‍ये मदत होते, हे तत्त्व इथेही लागू पडते.

कोट.

मनपाच्या केंद्रांमध्ये दररोज किमान तीनशे नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे; परंतु अनेक नागरिक हे सकाळपासूनच रांगा लावण्यासाठी गर्दी करीत आहेत; परंतु आरोग्य कर्मचारीदेखील सामान्य माणसे असून, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत असल्याने याबाबत नागरिकांनीदेखील संयम ठेवणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी गर्दी न करता अंतर राखणे हे नागरिकांच्याच हिताचे आहे.

डॉ. अजिता साळुंके, मनपा वैद्यकीय अधिकारी

(ही डमी आहे.)

Web Title: Shortage of vaccines right now; The rush to fly in May!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.