झोडगेत सायकलपटू अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:08 PM2018-08-26T22:08:45+5:302018-08-26T22:09:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमेश्वर : लहानपणापासून अनेक छंद जडलेले असतात. छंदापायी अनेक जणांचा नावलौकिक वाढतो; तर हाच छंद कुणाचा जीवही घेणारा ठरतो, असाच काहीसा प्रकार धुळ्यातील सायकलपटूबाबत घडला. धुळ्याहून चांदवडला सायकलने देवीदर्शनाला येताना ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलपटूला जीव गमवावा लागला.
धुळे येथील हौशी व अनेकांना मार्गदर्शन करणारे गिर्यारोहक मंगेश एकनाथ वडगे (५४) यांचा रविवारी सकाळी झोडगे गावानजीक ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू झाला.
मूळचे मालेगावचे रहिवासी असलेले मंगेश वडगे व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून धुळे येथे स्थायिक झाले होते. त्यांचे वडील एकनाथ वडगे हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. काही वर्षे नाशिकमध्ये ते नोकरीनिमित्त मुक्कामी होते. त्यावेळी मंगेश यांचे माध्यमिक शाळेतील शिक्षण नाशकात झाले होते. त्यांचे मोठे बंधू नाशकात स्थायिक आहेत. मंगेश वडगे यांचा मुलगा गौरव हा इंडोनेशियात नोकरी करतो. गौरव हा राष्ट्रीय पातळीवर ट्रायथलॉन खेळाडू आहे. धावणे, पोहणे व सायकल चालविणे हे तीन खेळ एकाचवेळी खेळल्या जाणाऱ्या ट्रायथलॉन या खेळात हैदराबाद येथे त्याने साडेसात तास सलग ट्रायथलॉन करून राष्ट्रीय पातळीवर रेकॉर्ड केले होते. तर मुलगी कावेरी ही नाशिकला इंजिनिअरिंग करीत आहे. धुळे येथील नगरपट्टी भागात कावेरी वॉच कंपनी या नावाने मंगेश वडगे घड्याळ दुरुस्ती व विक्रीचे दुकान चालवित असत. सायकलद्वारे अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी केल्या. रोज किमान ४० किमी सायकलिंग ते करीत असत. हा छंदच त्यांना मृत्यूच्या दाढेत घेऊन जाणारा ठरला. वडगे रविवारी (दि. २६) पहाटे सायकलवरून चांदवड येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी येण्यासाठी मित्रांसोबत निघाले.
या घटनेने नाशिकसह मालेगाव व धुळे येथील मित्रपरिवारावर मोठा आघात झाला. त्यांनी मनाली ते लेह असा खडतर ५५० किमीचा व धुळे ते सुरत असा ६०० किमीचा टप्पा सायकलद्वारे पार केला होता. गिर्यारोहण व जलतरणाचीही त्यांना आवड होती. अनेक तरुणांना, विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले होते. प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. संगमेश्वर येथील माधवराव पूरकर यांचे ते जावई होत. एका सायकलपटूचा सायकल मोहिमेतच मृत्यू व्हावा या घटनेने दु:ख व्यक्त होत आहे. सोमवारी
त्यांच्यावर धुळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.