कुंटणखाना ‘सील’ करावा का? पोलीस आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:21+5:302021-07-21T04:12:21+5:30
देहविक्रयासाठी पीडित महिलांना भाग पाडून त्यांच्या देहविक्रयाच्या माध्यमातून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी जास्तीचा वाटा आपल्याकडे ठेवून उपजीविका करणाऱ्यांविरुध्द अनैतिक व्यापार ...
देहविक्रयासाठी पीडित महिलांना भाग पाडून त्यांच्या देहविक्रयाच्या माध्यमातून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी जास्तीचा वाटा आपल्याकडे ठेवून उपजीविका करणाऱ्यांविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांकडून कारवाई केली जाते. कुंटणखाने चालविणे बेकायदा असून भद्रकाली पोलीस व गुन्हे शाखेने पिंपळ चौकातील अशाच देहविक्रयाचा व्यवसाय २०१६ व २०१८ साली छापे टाकून बंद पाडला होता. याप्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या संशयितांसह जागा मालक अशा सात संशयितांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यातील जागा मालकाला पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आता ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून कुंटणखाना का सील करण्यात येऊ नये? याबाबत खुलासा मागितला आहे. अशा प्रकारे अवैध व्यवसायांना आपल्या जागेत आश्रय देणाऱ्या जागा मालकांना पोलीस प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता पाण्डेय हे यानंतर काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना पाण्डेय यांनी फर्मान काढले असून आपआपल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दतील चोरीछुप्या पध्दतीने देहविक्रयाचा व्यवसाय सुरू असल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.