नाशिक बाजार समिती सभापती चुंभळेंना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:20 PM2020-02-18T15:20:15+5:302020-02-18T15:22:12+5:30
बाजार समितीचे राजकारण वेगळ्याच वळणावर पोहोचले असून, गेल्या आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचे आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संपतराव सकाळे यांच्याकडे देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजार समितीतील वाद विकोपाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध ११ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने चुंभळे यांना बाजार समितीच्या संचालकपदावरून का काढून टाकण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे सभापती चुंभळे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर चुंभळे विरोधी गटाचे ११ संचालक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.
बाजार समितीचे राजकारण वेगळ्याच वळणावर पोहोचले असून, गेल्या आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचे आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संपतराव सकाळे यांच्याकडे देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजार समितीतील वाद विकोपाला गेला. सभापती चुंभळे यांचे अधिकार काढून घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ११ संचालकांनी चुंभळे यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी करून त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव करून तो जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला आहे. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी ११ संचालकांनी एकत्र येत सभापती चुंभळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला असून, त्यावरून चुंभळे व सकाळे गटात जोरदार हाणामारीही होऊन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बाजार समितीची सभापती चुंभळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यात चुंभळे यांनी अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्य पार पाडण्यास जाणून बुजून कसूर केला असल्याने बाजार समितीच्या नुकसानीस जबाबदार धरून समिती सदस्य पदावरून आपणास का काढून टाकण्यात येऊ नये असे नमूद केले आहे. या नोटिसीवर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.