बोटाला शाई दाखवा, सवलतीत चित्रपट पाहा !
By admin | Published: February 19, 2017 12:59 AM2017-02-19T00:59:56+5:302017-02-19T01:00:28+5:30
मतदार जागृती : दामोदर-विजयानंद थिएटरचा उपक्रम
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान करा आणि बोटाला लावलेली शाई दाखवून खुशाल दामोदर-विजयानंद थिएटरमध्ये सवलतीच्या दरात चित्रपटाचा आनंद लुटा. थिएटरचे संचालक विनय चुंभळे यांनी महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तिकीट दरात २० टक्के सवलत योजना जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नाशिक महापालिकेमार्फत त्यासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत व मिसेस युनिव्हर्स नमिता कोहोक, अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांची संदेशदूत म्हणून नियुक्ती करत मतदार जागृती केली जात आहे. शहरातील विविध व्यावसायिकांनीही मतदार जागृतीच्या उपक्रमात सहभागी होत सवलत योजना जाहीर कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकच्या दामोदर आणि विजयानंद थिएटरचे संचालक विनय चुंभळे यांनी खास सवलत योजना जाहीर केली आहे. दि. २१ फेबु्रवारीला जे नागरिक मतदान करुन चित्रपट पाहण्यास येतील, त्यांनी बोटावरील शाई दाखविल्यास चित्रपटाच्या तिकिटाच्या दरात २० टक्के सवलत दिली जाणार आहे. सदर सवलत योजना दि. २१ रोजी मतदानाच्या दिवशी चारही शोसाठी असणार आहे. प्रत्येकाने निकोप लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजवायला हवा. मतदानासाठी लोक प्रवृत्त व्हावे याकरीता आपण चित्रपटगृहांमध्ये ही सवलत योजना देत असल्याचे विनय चुंभळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी
लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या वेळी शहरात अनेक व्यावसायिकांनी मतदान जागृतीच्या या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. आता महापालिका निवडणुकीसाठीही योग्य उमेदवार निवडून जावेत आणि प्रत्येकाला घटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मनपा प्रशासनामार्फत विशेष उपक्रम राबविले जात असून, व्यावसायिकांनी मतदानाच्या दिवशी नागरिकांना त्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता सवलत योजना राबवावी, असे आवाहन मनपाने केले आहे.