निधीची लालूच दाखवत करवाढीचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:31 AM2017-08-19T00:31:57+5:302017-08-19T00:32:09+5:30
७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची लालूच दाखवत प्रशासनाने नागरिकांवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून करवाढ लादली असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. सदर करवाढ फेटाळून लावण्यासाठी सर्व नगरसेवकांनी सभागृहात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
नाशिक : ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची लालूच दाखवत प्रशासनाने नागरिकांवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून करवाढ लादली असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. सदर करवाढ फेटाळून लावण्यासाठी सर्व नगरसेवकांनी सभागृहात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
दशरथ पाटील यांनी करवाढीचा निषेध करत सांगितले, महापालिकेच्या इतिहासात एवढी मोठी करवाढ होत असताना विरोधक केवळ बोलघेवडेपणा करत आहेत. नागरिकांनी त्यांना प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात पाठविले आहे. त्यामुळे, नगरसेवकांनी सभागृहाच्याच माध्यमातून कठोर भूमिका घेत करवाढीचा निर्णय हाणून पाडावा. यापूर्वी, जेएनएनयूआरएमच्या योजनेच्या अंमलबजावणीप्रसंगीही करवाढ लादण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तो हाणून पाडण्यात आला होता. आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुन्हा करवाढीचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या करवाढीला नागरिकांचा कडाडून विरोध आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संगनमत करत नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचविण्याचा डाव रचला आहे. वास्तविक, प्रशासनाकडून देण्यात येणारा ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी हा कायद्यात बसत नाही. परंतु, गेल्या आठ महिन्यांचा कारभार पाहता नियम व कायद्याचे धिंडवडे काढले जात आहेत. सत्ताधारी व विरोधक एकाच माळेचे मणी आहेत. नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाºयांनी सभागृहात या करवाढीला कडाडून विरोध करत ती फेटाळून लावावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा मार्ग मोकळा असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.