उद्दाम अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:14 AM2017-07-21T00:14:48+5:302017-07-21T00:15:13+5:30
उद्दाम अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
येवला : कार्यालयीन वेळेत अधिकाऱ्यांचे मद्यपान प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्क
येवला : पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी गावाला भेटीसाठी जात असल्याचे सभापतींना दूरध्वनीवरून सांगून ते हॉटेलमध्ये कार्यालयीन वेळेत मद्यपान करीत बसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणताच ‘त्या’ उद्दाम अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पंचायत समिती सदस्य अॅड. मंगेश भगत व मोहन शेलार पंचायत समितीत आले असता अनंत यादव व प्रशांत वास्ते यांची वाट पाहत लोक थांबलेले होते. दुपारी ४ वाजले तरी एकही अधिकारी कार्यालयात आला नाही. नायगव्हाणचे माजी सरपंच अशोक सदगीर यांनी सभापती कक्षात येऊन संबंधित दोन अधिकारी शहरातील हॉटेलमध्ये मद्यप्राशन करत असल्याचे गटनेते भगत व शेलार यांना सांगितले. सदर बाबीची सभापती साळवे यांना कल्पना दिल्यावर त्यांनी सहायक गटविकास अधिकारी व प्रशासन अधिकारी यांना सोबत घेऊन तक्रारदारासह संबंधित हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी हॉटेलला भेट दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कृषी अधिकारी प्रशांत वास्ते व मनेरेगाचे विस्तार अधिकारी आनंद यादव यांना गुरु वारी गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सभापतीसह सर्व सदस्यांनी गुरु वारी जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या बाबतची तक्र ार केली आहे. यावर २१ जुलै पर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांनी या शिष्टमंंडळाला दिले आहे. यादव व वास्ते यांनी सेवा नियमाचा भंग केल्याने सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करून तीन दिवसात खुलासा सादर करावा, असे या नोटिसीत म्हटले आहे. दोषींवर कारवाइची, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही हालचाल नोेंद करण्याची सक्ती करण्याची मागणी बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा पवार यांनी केली आहे.