जास्त रिटर्न्सचे आमिष दाखवून सिडकोमध्ये पॉलिसीधारकास आठ लाखांना गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 06:54 PM2018-02-24T18:54:40+5:302018-02-24T18:54:40+5:30
खाते क्रमांकावर सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांचा वेळोवेळी भरणा केला. रक्कम खात्यात जमा होताच ‘त्या’ भामट्या विमा कंपनीच्या अधिका-याने भ्रमणध्वनी बंद करून कुठलाही परतावा पानसरे यांना दिला नाही.
नाशिक : सिडकोमधील चेतनानगर भागात राहणाºया एका ५८ वर्षीय नागरिकाला अज्ञात भामट्याने विमा पॉलिसीमध्ये तांत्रिक अडचणीचे कारण सांगून नव्या पॉलिसीचे जास्त परताव्याचे आमिष दाखवून सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चेतनानगरमधील सीतासदन येथे राहणा-या दत्तात्रय बाबुराव पानसरे यांना एका विमा कंपनीचे नाव सांगत अधिकारी असल्याची बतावणी करून एका भामट्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून पुन्हा संपर्क साधत पॉलिसीला तांत्रिक अडचण आल्याचे सांगितले. तसेच नवीन पॉलिसी काढल्यास तुम्हाला जुन्या पॉलिसीच्या तुलनेत अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून १६ आॅगस्ट ते २७ नोव्हेंबर या कालावधीदरम्यान या भामट्याने एचडीएफसी बॅँकेच्या एका खात्यावर वेळोवेळी धनादेश व आरटीजीएसद्वारे नव्या पॉलिसीची रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार पानसरे यांनी त्याने दिलेल्या खाते क्रमांकावर सुमारे ७ लाख ९८ हजार ५९३ रुपयांचा वेळोवेळी भरणा केला. रक्कम खात्यात जमा होताच ‘त्या’ भामट्या विमा कंपनीच्या अधिका-याने भ्रमणध्वनी बंद करून कु ठलाही परतावा पानसरे यांना दिला नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पानसरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित विमा कंपनीच्या भामट्या अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत.