पाळे खुर्द परिसरात चंदनचोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:19 PM2019-05-02T18:19:37+5:302019-05-02T18:19:53+5:30
पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे चंदनचोरांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतातील चंदनाच्या झाडाला छिद्र पाडून गाभा तपासून त्याची चोरी केली जात आहे. याकडे वनविभागाची दुर्लक्ष होत आहे.
पाळे खुर्द : येथील परिसरातील आसोली येथे चंदनचोरांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतातील चंदनाच्या झाडाला छिद्र पाडून गाभा तपासून त्याची चोरी केली जात आहे. याकडे वनविभागाची दुर्लक्ष होत आहे. आजपर्यंत अनेक चंदनाची झाडे चोरी गेल्यामुळे चंदनचोर मोकाट आहे. प्रशासन चंदनचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आसोली येथे शेतकरी रामदास वामन देवरे यांच्या शेतातील बांधावरील चंदनाच्या झाडाला छिद्र पाडून चोरण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही. देवरे यांच्या शेतातील आजपर्यंत अनेक चंदनाची झाडे चोरीस गेलेली आहेत. त्यामुळे चंदन तस्करांचे मोठ्या प्रमाणात फावले आहे. शेतातील बांधावरील नदीकाठचे चंदनाचे झाड रात्री चोरटे चोरून नेत आहेत, अशा घटना अनेक वेळा झाल्या आहेत. वनविभागाचे कर्मचारी याकडे डोळेझाक करीत आहेत. राजरोस चंदनाच्या झाडाची चोरी होत आहे. चंदनाची होत असलेली कत्तल थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.